खंडणीच्या संदेशाने वैद्यकीय महाविद्यालयांत खळबळ
By admin | Published: May 14, 2017 12:43 AM2017-05-14T00:43:19+5:302017-05-14T00:43:19+5:30
जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वच सेवा संगणकीकृत झाल्या आहेत. या माध्यमातून नागरिकांना सेवा देत असताना
संकेतस्थळावर व्हायरसचा अटॅक : फाईल करप्ट करण्याची धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वच सेवा संगणकीकृत झाल्या आहेत. या माध्यमातून नागरिकांना सेवा देत असताना शुक्रवारी अचानक वैद्यकीय महाविद्यालयातील संकेतस्थळ जाम झाले. वैद्यकीय महाविद्यालयातील संगणकावर काम करण्यास प्रारंभ करताच थेट खंडणीचा संदेश झळकत होता. यामुळे दिवसभर चांगलीच खळबळ माजली होती.
घडलेल्या या प्रकाराला सावंगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला. चौकशीअंती हा सर्व प्रकार एका व्हायरसमुळे झाल्याचे समोर आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सायंकाळी सर्वच स्थिती नियमित झाल्याचे समोर आले; मात्र या व्हायरसमुळे संगणकातील सिस्टीम डॅमेज झाल्याचे व्यवस्थापनाच्यावतीने सांगण्यात आले.
हा प्रकार वर्धेतच नव्हे तर राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयात घडल्याची माहिती आहे. या महाविद्यालयात असलेल्या संकेतस्थळावर जाताच या व्हायरसच्या माध्यमातून डेक्सटॉपवर एक नोट येत होती. यात खंडणीची मागणी करणारा संदेश झळकत होता. यात मागण्यात आलेली खंडणी न दिल्यास संगणकावरील संपूर्ण महत्त्वाच्या फाईल्स करप्ट करण्यात येईल, असा मचकूर यात असल्याची माहिती एका वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.
दिवसभर हाच प्रकार सुरू असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना त्रासाचा सामना करावा लागला. सावंगी रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना अखेर वैयक्तिकरित्या काम करून सेवा देण्यात आली. येथे येणाऱ्या रुग्णांना त्रास होणार नाही याची दक्षता रुग्णालयाच्यावतीने घेण्यात आल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
‘रॅन्समवेअर’ व्हायरसमुळे घडला प्रकार
दिवसभर वैद्यकीय महाविद्यालयातील संगणकीय क्षेत्रातील व्यवस्थपकांच्या तोंडचे पाणी पळविणारा हा प्रकार ‘रॅन्समवेअर’ या व्हायरसमुळे घडल्याचे समोर आले आहे. सायंकाळपर्यंत या व्हायरसमुळे निर्माण झालेली सेवा सुरळीत झाल्याची माहिती आहे.
खंडणी द्या, अन्यथा फाईल करप्ट करू
दिवसभर वैद्यकीय महाविद्यालयांना चक्रावून सोडणाऱ्या या प्रकारात खंडणीची नोट डेक्सटॉपवर येत होती. डेक्सटॉपवर येत असलेली रक्कम भरा, अन्यथा तुमच्या संगणकातील संपूर्ण डाटा करप्ट करण्यात येईल, अशी नोट यावर येत होती. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात चांगलीच खळबळ माजली होती.