कारयात्रेतून ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’चा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:26 PM2019-02-11T22:26:53+5:302019-02-11T22:27:37+5:30
सडक सुरक्षा, जीवन रक्षा हा संदेश देणारी दिल्लीच्या राजघाट येथून निघालेली कार यात्रा रविवारी पूणे होत रात्री उशीरा सेवाग्राम येथे दाखल झाली. सोमवारी सकाळी या कार यात्रेतील सहभागी मान्यवरांनी येथील गांधी आश्रमाची पाहणी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी ही कार रॅली यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सडक सुरक्षा, जीवन रक्षा हा संदेश देणारी दिल्लीच्या राजघाट येथून निघालेली कार यात्रा रविवारी पूणे होत रात्री उशीरा सेवाग्राम येथे दाखल झाली. सोमवारी सकाळी या कार यात्रेतील सहभागी मान्यवरांनी येथील गांधी आश्रमाची पाहणी करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर दुपारी ही कार रॅली यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून ही विशेष कार यात्रा काढण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पूणे येथून ही कार यात्रा वर्धेत रविवारी उशीरा दाखल झाली. यात्रेकरूंनी सोमवारी सकाळी बापूकूटीत नतमस्तक होऊन राष्ट्रपित्याला अभिवादन केले. त्यानंतर ही कार यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली. भारत सरकारच्या पुढाकाराने कलिंगा मोटर स्पोर्टस् क्लब भुवनेश्वर उडिसा यांच्या सहकार्याने ही कार यात्रा आयोजित करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने यात्रेकरू नागरिकांना ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’चा संदेश देत आहेत.
आठ महिलांचा समावेश
या कार यात्रेत वेगवेळ्या विभागाचे लोक व नागरिक सहभागी झाले आहेत. इतकेच नव्हे तर आठ महिलांसह २२ पुरुषांचा त्यात समावेश असून गांधीजींचे सचिव म्हणून काम केलेले ९७ वर्षीय व्ही. लल्यानम् ही दिल्ली ते पुणेपर्यंत यात्रेत सहभागी झाले होते.
वाहतूक नियमांचे पटवून देत आहेत महत्त्व
रस्ता सुरक्षा सप्ताह अभियाना अंतर्गत ही यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेची सुरूवात दिल्लीच्या राजघाट येथून झाली असून यात्रेतील सहभागी मान्यवर नागरिकांना वाहन चालविताना वाहतूक नियम पाळणे कसे फायद्याचे ठरते हे पटवून देत आहेत. शिवाय जीव लाखमोलाचा आहे, याचे भान ठेऊन वाहनचालकांनी वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, हेही ते पटवून देत आहेत.
३,००० कि.मी. प्रवास पूर्ण
दिल्ली ते सेवाग्राम असा तीन हजार कि़मी.चा प्रवास या यात्रेकरूंनी आतापर्यंत पूर्ण केला आहे. सोमवारी ही यात्रा जबलपूरच्या दिशेने रवाना झाली असून ती मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, ऊत्तराखंड, बंगाल होत बांग्लादेश येथे जाणार आहे. त्यानंतर आगरा, म्यानमार येथे पोहोचेल. २५ फेबु्रवारीला या कार यात्रेचा समारोप होणार आहे.
भारत सरकारच्या अभियान अंतर्गत ही यात्रा आहे. सडक सुरक्षा जनजागृती आणि गांधीजींचा विचारांचा प्रचार करण्याचे काम या अभियानातून आम्ही करीत आहो. ही कार यात्रा ७,२५० कि.मी.ची असून सर्वत्र च़ागला प्रतिसाद मिळत आहे.
- लाजप्रत प्रसाद, यात्रेतील सहभागी सदस्य.