अर्धवट बांधकामामुळे प्रवासी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:24 AM2018-07-14T00:24:58+5:302018-07-14T00:26:44+5:30
येथे अद्ययावत बसस्थानक निर्मितीसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी भूमिपुजनाचा सोपसकार पूर्ण झाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : येथे अद्ययावत बसस्थानक निर्मितीसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी भूमिपुजनाचा सोपसकार पूर्ण झाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले. परंतु, हे काम कासवगतीनेच होत असल्याने शिवाय प्रवाशांसाठी पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था न करण्यात येताच जुनी इमारत जमिनदोस्त करण्यात आल्याने सध्या प्रवाशांना झाडांचा आधार घ्यावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलांसह विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
गत ९ एप्रिलला मोठा गाजावाजा करून देवळीच्या नवीन बसस्थानकाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ३ कोटींच्या निधीतून अद्यायवत व आधुनिक बसस्थानक तयार होईल, असे यावेळी सांगण्यात आले होते. शिवाय येत्या दोन-चार दिवसात नव्या बस स्थानकाचे बांधकामही सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्ष कृती करण्याकडे पाठच दाखविण्यात आली. कंत्राटदाराने बसस्थानकाची जुनी इमारत जमिनदोस्त केली. त्यामुळे सध्या पावसापासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्रवाशांना परिसरातील चहा टपरींचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांची समस्या लक्षात घेता पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. परंतु, दहा बाय दहाचे एक प्लास्टिक टाकून तात्पूर्ता निवारा तयार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर सदर बस स्थानकात पावसाचे पाणी साचून राहत असून तेथे चिखल तयार झाला आहे. प्रवाशांना चिखल तुडवतच बस मध्ये चढावे लागत आहे. सदर प्रकाराकडे रापमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
साधी वीट ठेवण्यासाठीही मुहूर्ताचा शोध?
भुमिपूजन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु, नवीन बसस्थानकाच्या निर्मितीसाठी आतापर्यंत साधी एक वीटही ठेवण्यात आली नाही. त्यातच सध्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. साधी वीट ठेवण्यासाठी रापमचे अधिकारी व कंत्राटदार कुठला मुहूर्त तर शोधत नाही ना, असा प्रश्न सध्या संतप्त प्रवासी उपस्थित करीत आहेत. त्यामुळे रापमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याच्या सुचना द्याव्या, अशी मागणी आहे.
नवीन बसस्थानकात राहणार या सोयी-सुविधा
३ कोटींच्या खर्चातून या स्थानकावर आठ प्लॅटफार्म, मिटिंग हॉल, तीन विश्रामगृह, महिला व पुरुषांसाठी प्रसाधनगृह, दर्शनीय भागात बगीचा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कुंपन भिंत, दुकानांची व्यवस्था, पार्सल आॅफीस, स्वतंत्र पोलीस चौकी, वाहनतळ, आधुनिक फॉल सिलींग तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे; पण सध्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने पर्यायी व्यवस्था गरजेचे आहे.