वर्ध्यात स्थलांतरीत फ्लेमिंगो दाखल; क्रेन पक्ष्यांचा लाल नाल्यावर मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 05:52 PM2023-03-02T17:52:35+5:302023-03-02T17:53:11+5:30
Wardha News दर वर्षी न चुकता प्रवासी पक्षी भारतातील वेगवेगळ्या भागात येतात. भारतभर त्याचे वितरण होत असून हे सुंदर देखणे पक्षी पाहण्याचा आनंद पक्षीप्रेमी घेत असतात.
वर्धा : दर वर्षी न चुकता प्रवासी पक्षी भारतातील वेगवेगळ्या भागात येतात. भारतभर त्याचे वितरण होत असून हे सुंदर देखणे पक्षी पाहण्याचा आनंद पक्षीप्रेमी घेत असतात. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्पानंतर लाल नाला प्रकल्पही या पक्ष्यांचा अधिवास म्हणून नावारुपास आला आहे.
मोठे रुबाबदार, देखणे पक्षी या धरणावर पाहायला मिळतात. सन-२०१९ मध्ये पोथरा धरणावर ४७ फ्लेमिंगो पक्षी आले होते. सर्व प्रथम निसर्गसाथी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडू यांनी १८ पक्ष्यांची नोंद करून तेथील मासेमारी करणाऱ्यांना या पक्ष्यांची माहिती देऊन त्यांना सुरक्षितता देण्याची विनंती केली होती. त्या तुलनेत लाल नाला हा एकदम नवीन अधिवास असून इथेही मोठ्या प्रमाणावर पक्षी यायला लागले आहे. यापूर्वी २०१७ मध्ये ‘फॉलकेटेड डक’ या धरणावर आढळली होती. या बदकाची महाराष्ट्र राज्यातील पहिली नोंद होती. २०२० साली लाल नाला येथे शेंडी बदक यांची जोडी विहार करताना पहिल्यांदाच दिसली. नेहमीप्रमाणे पक्षी निरीक्षण करीत असताना प्रवीण कडू यांना पहिल्यांदा इथे सात फ्लेमिंगो पाण्यात वावरताना दिसले. या धरणाला लागून जंगल आणि शेतीचा भाग आहे. त्यामुळे ‘ग्रेटर फ्लेमिंगो’करिता हे स्थान उत्कृष्ट अधिवास आहे. फ्लेमिंगो हा गिधाडापेक्षा मोठा पक्षी स्थानिक स्थलांतर करणारा जायकवाडी धरण, उजनी धरण, शिवणी धरण या शिवाय खाऱ्या पाण्याचे तलाव, समुद्रकिनारे, खाड्या, खारफुटीची दलदल, गोड्या पाण्याचे जलाशय यांच्यासाठी उत्तम अधिवास असल्यामुळे तिथे यांचे वावरणे असते.
चोचीने गाळातून निवडतो अन्न
फ्लेमिंगोला मराठीमध्ये मोठा रोहित, पांडव, अग्निपंख अशा विविध नावाने ओळखल्या जाते. लांब मान, लांब पाय, नळाचा तोटी प्रमाणे वाकलेली त्याची विशिष्ट चोच त्याला सर्वात वेगळे आणि राजसी रुप प्रदान करते. गाळातून अन्न निवडताना त्याला त्याचा चोचीचा उपयोग होतो. खेकडे, गोगलगाय, पानकिडे, पानवनस्पतीच्या बिया इत्यादीचा समावेश त्याचा खाद्यात होते. त्यांना धोका संभावला तर तो पाण्यात एक-एक पाऊल टाकून पॅडलिंंग करून हवेत उडतात.
फ्लेमिंगोची पहिल्यांदाच नोंद
फ्लेमिंगो उडताना ‘व्ही’ आकाराची माळ हवेत करून उडतात तेव्हा त्यांचा पंखांचा शेंदरी रंग व पंखांची काळी किनार स्पष्ट दिसते, म्हणून त्यांना ‘अग्निपंख’ म्हणतात. फ्लेमिंगोला प्रथमच लाल नाला येथे पाहून पक्षी अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला. धरणाच्या दुसऱ्या बाजूला काही पक्षी पाण्याच्या काठावर विसावा घेत आहे, असे लक्षात आले. दुर्बिणीने तेथील पक्ष्यांना टिपत असताना तिथे १५ सामान्य क्रौंच असल्याचे लक्षात आले. लाल नाला इथे त्यांची ही पहिलीच नोंद आहे. युरेशीयावरून हे पक्षी दर वर्षी भारतात येतात. सामान्य क्रौंच हा स्थलांतर करणारा मोठा पक्षी आहे. स्थलांतरण त्यांच्याकरिता जीवन मरणाचा प्रश्न असतो. अनेक पक्षी स्थलांतरादरम्यान मृत्युमुखी पडतात तरीही ते स्थलांतर करतात. पोथरानंतर आता लाल नालाही या पक्ष्यांचा अधिवास असल्याचे निसर्गसारथी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडू, यशवंत शिवणकर यांनी सांगितले आहे.