दूध उत्पादकांना लिटरमागे २० रुपयांचा नफा

By admin | Published: April 18, 2017 01:15 AM2017-04-18T01:15:23+5:302017-04-18T01:15:23+5:30

वित्तमंत्र्यांच्या सूचनेवरून मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादन वाढीसाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

Milk producers profit of Rs 20 per liter | दूध उत्पादकांना लिटरमागे २० रुपयांचा नफा

दूध उत्पादकांना लिटरमागे २० रुपयांचा नफा

Next

राज्य शासनाचा विशेष उपक्रम : ३४ गावांत सामंजस्य करारानंतर अंमलबजावणी
महेश सायखेडे वर्धा
वित्तमंत्र्यांच्या सूचनेवरून मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादन वाढीसाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. याकरिता पशु, दुग्ध व मत्स्य विभाग तथा राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या उपक्रमाकरिता वर्धा जिल्ह्यातील ३४ गावांची निवड झाली आहे. या योजनेमुळे ३४ गावांतील दूध उत्पादकांना सुगीचे दिवस आले असून पूर्वीच्या तुलनेत लिटरमागे तब्बल २० रुपयांचा नफा होत आहे.
आॅक्टोबर २०१६ मध्ये शासनाने दूध उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने या विशेष उपक्रमाची घोषणा केली. सध्या या उपक्रमाची जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाकडून अंमलबजावणी सुरू आहे. उपक्रमात आष्टी तालुक्यातील चार, आर्वी तालुक्यातील १३, कारंजा तालुक्यातील ११, वर्धा तालुक्यातील चार, देवळी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. येथील गो-पालकांना जि.प. पशुसंवर्धन विभाग मार्गदर्शन करीत आहे. उत्पादीत होणारे दूध गावातच खरेदी होत आहे. गावातच खरेदीदार उपलब्ध होत असल्याने दूध उत्पादकांचेही खेटे वाचले आहेत.

पशुसंवर्धन विभागाकडून विविध सुविधा
आॅनलाईन मिळतो दुधाचा चुकारा
निवड करण्यात आलेल्या ३४ गावांमधून कमी- अधिक प्रमाणात दूध विकत घेतले जाते. संकलिक केलेल्या दुधाचा चुकारा आठवड्यातून एक दिवस केला जातो. दूध उत्पादक व खरेदीदार यांच्यातील व्यवहार पारदर्शी व्हावे, यासाठी दुधाच्या चुकाऱ्याची रक्कम आॅनलाईन पद्धतीचा वापर करून दिली जाते.

निवड केलेल्या जिल्ह्यातील ३४ गावांमधील दूध उत्पादकांना जि.प. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने हिरवा चारा पुरविण्यासह विविध सुविधा देण्यात येत आहेत. २०१७-१८ मध्ये ६ हजार ६०० गोपालकांना चारा उपलब्ध करून देण्यात येणार असून वैरण बियाण्यांचेही वाटप करण्यात येईल. त्याचप्रमाणे वेळोवेळी केवळ १ रुपया शुल्क आकारून जनावरांचे लसीकरण केले जाईल.
दूध उत्पादकांच्या डोळ्यासमोर ठरतो दर
गावातच दुधाची विक्री होत असल्याने तसेच योग्य भाव मिळत असल्याने दूध उत्पादकांसाठी समाधानकारक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. ३४ गावांत दूध खरेदीचे केंद्र देण्यात आल्याने दुधाला प्रती लिटर १८ ते २० रुपये अधिकचा दर मिळत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गायीच्या दुधाला प्रती लिटर ३८ ते ४० आणि म्हशीच्या दुधाला ५८ रुपये दर दिला जात आहे. त्याची पावतीही विक्रेत्याला देण्यात येत आहे. यामुळे हा उपक्रम दूध उत्पादकांसाठी लाभदायक ठरत असल्याचे दिसते.

जिल्हाधिकारी घेतात वेळोवेळी आढावा
जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या ३४ गावांमध्ये राबविल्या जात असलेल्या विशेष उपक्रमाचा आढावा वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला जातो. वेळप्रसंगी ते दूध संकलन केंद्रांनाही भेटी देत कामकाजाची पाहणी करतात. प्रत्येक महिन्याला घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत असून त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.

एडीडीबी आल्याने दूध व्यवसायाला चालना मिळाली आहे. आमच्याकडे चाऱ्याचे योग्य नियोजन आहे. राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमामुळे सुवर्ण संधीच जिल्ह्यातील गोपालकांसाठी आहे. या योजनेमुळे बाजारपेठ उपलब्ध झाली असून याचा गोपालकांनी लाभ घ्यावा. कुठल्याही अडचणी आल्यास थेट जि.प. पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार करावी.
- डॉ. सतीश राजू, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. वर्धा.

Web Title: Milk producers profit of Rs 20 per liter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.