मिल कामगाराचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 09:49 PM2018-11-05T21:49:57+5:302018-11-05T21:50:43+5:30
शहरातील जयभारत टेक्सटाईला रियल ईस्टेट कॉटन मीलच्या शेकडो कामगारांची दिवाळी अंधारात जाणार असल्याची शक्यता आहे. आॅक्टोबर १८ चे वेतन व दिवाळी बोनस दिवाळीपुर्वीच मिळावा या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून मील कामगारांनी कॉटन मीलच्या आत व्यवस्थापक, कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शहरातील जयभारत टेक्सटाईला रियल ईस्टेट कॉटन मीलच्या शेकडो कामगारांची दिवाळी अंधारात जाणार असल्याची शक्यता आहे. आॅक्टोबर १८ चे वेतन व दिवाळी बोनस दिवाळीपुर्वीच मिळावा या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून मील कामगारांनी कॉटन मीलच्या आत व्यवस्थापक, कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मील प्रशासनाच्यावतीने येथे कुणीही अधिकारी नसल्यामुळे शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने व्यवस्थापनाची बाजू पोलीस प्रशासन सांभाळत असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले. तर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
११३ वर्षाची गौरवशाली परंपरा असलेला व शहर परिसरातील ३५०० कामगारांना रोजगार देणारा तालुक्यातील पुलगाव कॉटन मील हा मोठा वस्त्रोद्योग आॅगस्ट २००३ मध्ये बंद झाला. त्यानंतर हा उद्योग राजस्थान येथील श्रीकृष्ण उद्योग समुहाने घेतला. जुनी सर्व यंत्र सामग्री व इमारत तोडून छोट्याशा जागेत दुमजली इमारतीत नवीन यंत्र साधने बसवून जयभारत टेक्सटाईल्स या नावाने सुरू केला. सुरूवातीस परप्रांतीय कामगारांकडून या मिलचे काम चालविण्यात येत होते. काही संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे काही स्थानिक युवकांना येथे रोजगार देण्यात आला. केवळ २०० ते २५० कामगारांना रोजगार तर मिळाला. परंतु नियमांची पायमल्ली करून चालविण्यात येत असलेल्या या उद्योगात अल्प वेतनासह अनेक बाबतीत कामगारांना अनेकदा आंदोलने करावी लागली.
व्यवस्थापनाच्या सतत वेळकाढू धोरणामुळे दिवाळी सारख्या सणाचे दिवशी महिला व युवा कामगारांना धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. सकाळी ७ वाजतापासून कामगारांनी आंबेडकरी विचार मंचचे नेता नगरसेवक कुंदन जांभुळकर, प्रहार जनशक्ती कामगार संघटनेचे तुषार वाघ, राजेश सावरकर, जयभारत टेक्सटाईल्स कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळू शहागडकर आदींचे नेतृत्वात आंदोलन केले. नेतृत्व करणारे कुंदन जांभुळकर व तुषार वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार मील प्रशासनाच्यावतीने बोलणी करण्यासाठी कुणीही अधिकारी नसल्यामुळे पोलीस प्रशासनाचे माध्यमातून मुंबई येथे असलेल्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर बोलणे होते.प्रशासन वेतन व बोनसची रक्कम यापैकी अर्धी रक्कम रोख व अर्धी रक्कम धनादेशाद्वारे ६ नोव्हेंबरच्या दुपारी १२ वाजेपर्यंत देण्यास तयार असून कामगारांना दोनपैकी कुठलीही रक्कम रोख स्वरूपात पाहिजे असल्याचे समजते. समझोता न झाल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यताही वर्तविल्या जात आहे.
दरम्यान मील गेटपुढे पोलिसांचा ताफा होता मील व कामगार या दोघांची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असून दिवाळी सणात कुठलाही तणाव निर्माण होवू न देता सार्वजनिक सुरक्षा व व्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सामजस्यांची भूमिका घेत कामगार व संघटनांच्या नेत्याचा व मुंबई येथे असणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलीस प्रशासनाच्यावतीने बलदेव भुते यांनी सांगितले. तणावपूर्ण स्थितीत आंदोलन आंदोलन सुरू असून अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.