जिल्ह्याच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल

By admin | Published: September 10, 2016 12:33 AM2016-09-10T00:33:32+5:302016-09-10T00:33:32+5:30

सण, उत्सव म्हटला की नागरिकांच्या आनंदाला पारावार राहत नाही. त्यात गणेशोत्सवाचे राज्यात विशेष स्थान आहे.

Millennium turnover in the district market | जिल्ह्याच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल

जिल्ह्याच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल

Next

प्रशांत हेलोंडे  वर्धा
सण, उत्सव म्हटला की नागरिकांच्या आनंदाला पारावार राहत नाही. त्यात गणेशोत्सवाचे राज्यात विशेष स्थान आहे. सर्वांचा आवडता बाप्पाच्या उत्सवाची वाट पाहत असतात. हरितालिका, गणेशोत्सव आणि गौरीच्या आवाहनासाठी मग, बाजारपेठाही त्याच पद्धतीने सजतात. वर्धा जिल्ह्यातील बाजारपेठाही सजल्या आणि त्याच प्रमाणात मोठी उलाढालही झाली. तीन ते चार दिवसांतच जिल्ह्यात तब्बल एक ते दीड कोटींच्या वर उलाढाल झाल्याची माहिती आहे.
गणेशोत्सवाची तयारी भाविक उत्साहाने करतात. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतीकरिताही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. सुबक सजावट, रोषणाई करून बाप्पाला दहा दिवसांकरिता विराजमान केले जाते. दररोज पूजा, आरती होते. यासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असल्याचे बाजारात फेरफटका मारला असता दिसून येते.
सार्वजनिक व घरगुती गणेशाच्या आगमनापूर्वी सजावटीवर विशेष भर दिला जातो. यासाठी बाजारात थर्माकोलची मंदिरे, विविध रंगांचे प्लास्टीकचे सजावट साहित्य, रोषणाईसाठी विविध प्रकारच्या सिरीज यासह अन्य सुशोभिकरणाचे साहित्यही बाजारात उपलब्ध आहे. जिल्ह्यात २५ लाख रुपयांचे सजावटीचे साहित्य विक्रीस आले होते. यातील १० लाखांपेक्षा अधिक साहित्याची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व असते. गणेश मूर्ती स्थापनेपूर्वी कलशाची स्थापना केली जाते. यासाठी नारळ लागतात. शिवाय हरितालिका व गौरी पूजनातही नारळाला विशेष मान असतो. ही बाब लक्षात घेऊनच वर्धा जिल्ह्यात दोन कोटी रुपयांचे तब्बल २० लाख नारळ मागविण्यात आले होते. दोन ते तीन दिवसांतच पाच लाखांवर नारळांची विक्री झाली. यातून बाजारपेठेत ८० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. गणेश विसर्जन आणि गौरी पूजनाचा शनिवार हा दिवस शिल्लक आहे. या दिवसांतही मोठी उलाढाल होण्याची शक्यता ठोक व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे. पूजेसाठी लागणाऱ्या धुप, दीप, अगरबत्ती आदी साहित्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पाहावयास मिळते. जिल्ह्यात सुमारे १० लाख रुपयांच्या विविध कंपनीच्या अगरबत्ती, धुपबत्तीचा माल मागविण्यात आल्याचे ठोक व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातील अर्ध्याधिक मालाची विक्री झाल्याची माहितीही देण्यात आली.
एकूण गणेशोत्सवाची धूम जिल्ह्यात जोरात आहे. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सजावट साहित्य, पूजेचे साहित्य आणि फुलांच्या बाजारामध्ये किमान एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली.

फुलांचीच बाजारपेठ पाच कोटींच्या घरात
गणेश चतुर्थीपासून गुरूवारपर्यंत जिल्ह्यात तब्बल १५० क्विंटल झेंडू, ३५ क्विंटल शेवंती व १० क्विंटल अन्य फुले असा माल आला. या फुलांची किंमत पाहिल्यास ठोकचा विचार केल्यासही तो दोन कोटींच्या घरात जातो. यानंतर महालक्ष्मी पूजनाकरिता जिल्ह्यात फुलांची वेगळी आवक झाली आहे. यात ५०० क्विंटल झेंडू, १५० क्विंटल शेवंती आणि ६० क्विंटल इतर फुले असा माल आला आहे. हा संपूर्ण माल नागपूर येथील बाजारपेठेतून आलेला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून बाजारात आणलेल्या फुलांचा यात समावेश नाही. जिल्ह्यातील केवळ फुलांच्या बाजारपेठेचा विचार केल्यास गत पाच दिवसांच्या काळात चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फुलांच्या बाजारात सर्वाधिक तेजी, मागणी वाढली
यंदा प्रत्येक प्रकारच्या फुलांचे भाव वधारलेले आहे. वर्धा जिल्ह्यात नागपूर, बंगलोर, मंगलोर येथील बाजारपेठांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फुलांचा माल येतो. यामुळे फुलांच्या माध्यमातून होणारी नेमकी उलाढाल माहिती होत नाही. असे असले तरी नागपूर येथील बाजार भावानुसार फुलांच्या माध्यमातून होणारी उलाढाल सर्वाधिक असल्याचेच दिसते. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये झेंडू, पांढरी फुले आणि गुलाबाची फुले सर्वाधिक आणली जातात. यात झेंडूची फुले ५० ते ६० रुपये किलो, पांढरी फुले २०० ते ३०० रुपये किलो आणि गुलाब ५०० ते ६०० रुपये किलो प्रमाणे ठोकमध्ये विकले गेले. ही फुले आणि त्यापासून तयार हारांची किंमत जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये अधिक होते. गणेशोत्सव, गौरी पूजन हे महत्त्वाचे सण असल्याने एरवी २० ते ५० रुपयांमध्ये मिळणारे हार १०० ते २०० रुपयांवर पोहोचले आहे. यातही विविध प्रकारचे गजरे व अन्य सजावटींच्या गुच्छांचे भावही वाढले आहेत.

Web Title: Millennium turnover in the district market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.