परंपरेच्या नावावर चालतो लाखोंचा जुगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2015 02:01 AM2015-09-13T02:01:44+5:302015-09-13T02:01:44+5:30
परंपरेच्या नावावर तालुक्यातील गावांमध्ये पोळ्याच्या सणात जुगार खेळण्याला उधाण येत असते.
तळेगाव (श्या.पं.) : परंपरेच्या नावावर तालुक्यातील गावांमध्ये पोळ्याच्या सणात जुगार खेळण्याला उधाण येत असते. यातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सर्वच आधीन गेल्याचे दिसून येते.
तळेगावात पोळ्याच्या चार दिवस आधीपासूनच जुगार सुरू होतो. नवरात्रीपर्र्यंत हा जुगार खेळ राहतो. आसपासच्या गावातील पुरूष, तरूण मंडळी जुगार खेळण्यास येतात. जुगाराची परंपरा सुरू रहावी म्हणून पोलिसांनी दोन तीन दिवस सकलत द्यावी, अशी मागणीही गावातील नागरिक करीत असतात. यामुळे दोन तीन दिवस जुगाऱ्यांना सुगीचे दिवस असतात. गावातील प्रतिष्ठित नागरिकही या जुगारात सहभागी होतात. परंतु प्रतिष्ठानच्या मागणीनुसार पोलीस प्रशासन यावर अंकुश ठेवण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळे ही परंपरा कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित होतो.
भारतीय संस्कृतीत पोळा सणाला फार महत्व आहे. या दिवशी बैलाला गोडधोड खावू घालून गड्याचाही सन्मान केला जातो. बैलांना सजविले जाते. परंतु यासोबतच प्रथा म्हणून जुगारही मोठ्या प्रमाणावर खेलला जातो. तरुणही यात सहभागी होतात. परंतु पोळ्यापुरताच हा सण न राहता जुगाराच्या आहारी जाऊन घरातील मालमत्ता गहाण ठेवण्यापर्यंत मजल जाते. दरवर्षी यात लाखोंची उलाढाल होते. त्यामुळे या कुप्रथेला आळा घालणे आवश्यक झाले आहे.(वार्ताहर)