दारूसाठ्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:01 AM2018-03-21T00:01:23+5:302018-03-21T00:01:23+5:30
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी कारवाई करुन दारूसाठ्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई दरम्यान दारूविक्रेत्यांविरुद्ध हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी कारवाई करुन दारूसाठ्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई दरम्यान दारूविक्रेत्यांविरुद्ध हिंगणघाट व समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हिंगणघाटातील इंदिरा गांधी वॉर्ड परिसरात नाके बंदी करुन पोलिसांनी एम. एच. ०४ सी. पी. ३७९४ क्रमांकाच्या कारची पाहणी केली. त्यात दारूसाठा आढळून आला. ठाकुरसिंग बावरी, सुरज धोटे, सेवकसिंग बावरी यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून ८४ हजार १०० रुपये किंमतीची दारू व कार पोलिसांनी जप्त केली आहे. दुसरी कारवाई समुद्रपूर ठाण्याच्या जाम चौरस्ता परिसरात करण्यात आली. यावेळी एम.एच. ३१ डी.के. ३०३१ क्रमांकाच्या कारची पाहणी केली असता त्यात १ लाख ८०० रुपये किंमतीची विदेशी दारू आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच कारही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी धर्मराज हिंगणेकर, रामकृष्ण सोरटे दोन्ही रा. चंद्रपूर यांच्याविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मौजा नंदोरी येथे छापा टाकून पोलिसांनी ३७ हजार ४०० रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली. तसेच छाया पानसे रा. नंदोरी, अनिकेत कांबळे यांच्याविरुद्ध समुद्रपूर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात पीएसआय श्रीकांत कडू, प्रेमराज अवचट, गिरडे, यशवंत गोल्हर, रवी वानखेडे, सुर्यवंशी यांनी ही कारवाई केली.