वर्धा जिल्ह्यातील घोराड येथे होणार लाखो वातींची त्रिपूरआरती; दोनशे वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 08:38 PM2021-11-17T20:38:19+5:302021-11-17T20:39:45+5:30
Wardha News विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र घोराड येथे गुरुवारी मध्यरात्री लाखो वातींचा त्रिपूर दरवर्षीप्रमाणे यंदाही लावला जाणार आहे.
वर्धा : विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र घोराड येथे गुरुवारी मध्यरात्री लाखो वातींचा त्रिपूर दरवर्षीप्रमाणे यंदाही लावला जाणार आहे.
संत केजाजी महाराज यांनी पावणे दोनशे वर्षांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा आजही जोपासली जात आहे. भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडत असून हा सोहळा पाहण्यासाठी गावातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
गावातील प्रत्येक घरून महिला कापसाच्या बनविलेल्या वाती विठ्ठल रखुमाई मंदिरात पौर्णिमेला आणतात. त्या एकत्रित केल्या जातात. या वातींची संख्या लाखाहून अधिक असते. या सर्व वाती तुपात भिजविलेल्या असतात. या सर्व वाती विठ्ठल रखुमाई मंदिराच्या कळसावर लावल्या जातात. त्यापूर्वी रात्री भजनी मंडळाचे भजन होत असून मध्यरात्री त्रिपूर लावल्यानंतर भजनी दिंड्या व त्यात सहभागी असलेले भाविक मंदिर परिकोटला प्रदक्षिणा घालतात, याच दिवशी काकडा आरतीचा समारोप होतो.
गुरुवारी आवळी पूजन
त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिर परिसरात असलेल्या आवळा वृक्षाचे पूजन करण्यात येणार आहे. याला आवळी पूजन म्हणतात. हा सोहळा सकाळी साजरा होणार आहे हे विशेष.