टाकी विक्रीतून बाजारपेठेत कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:17 PM2019-04-25T22:17:01+5:302019-04-25T22:17:55+5:30
पाणीटंचाई, आठ ते पंधरा दिवसांआड होणारा अल्प पाणीपुरवठा आणि हातपंप, विंधन विहिरींमधूनही पुरेसे पाणी येत नसल्याने पाणी साठवणुकीकरिता वापरात येणाऱ्या टाक्यांची शहरात प्रचंड मागणी वाढली आहे.
सुहास घनोकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पाणीटंचाई, आठ ते पंधरा दिवसांआड होणारा अल्प पाणीपुरवठा आणि हातपंप, विंधन विहिरींमधूनही पुरेसे पाणी येत नसल्याने पाणी साठवणुकीकरिता वापरात येणाऱ्या टाक्यांची शहरात प्रचंड मागणी वाढली आहे. एकट्या मार्चमध्ये ३,५०० टाक्या खरेदी करण्यात आल्याने बाजारपेठेत टाकी विक्री व्यवसायाने कोटींची उड्डाणे घेतल्याचे चित्र आहे. काही वर्षांपेक्षा यावर्षी तिपटीने विक्री वाढल्याची अधिकृत माहिती आहे.
अल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यात जलसंकट गडद झाले आहे. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये जूनपर्यंत पुरेल एवढाच उपयुक्त जलसाठा आहे. अल्पसा जलसाठा असल्याने शहरात सात दिवसांआड तर लगतच्या ग्रामीण भागात तब्बल पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असून फार विलंबाने आणि तोही अल्प पाणीपुरवठा होत आहे. यातच शहरातील बहुतांश विहिरींनी तळ गाठला कूपनलिकाही कोरड्या झाल्या आहेत.
शहरात आणि ग्रामीण भागात दररोज मोठ्या प्रमाणावर विंधनविहिरी केल्या जात आहेत. मात्र, २०० ते २५० फूट खोदूनही पाणी लागत नाही, अशी स्थिती आहे. गावातील विहिरी आणि शहरालगतच्या भागात शेती असलेल्या नागरिकांना तेथील विहिरीवरून पाणी आणत साठवावे लागत आहे. मात्र, घरची भांडीही अपुरी पडत असल्याने टाकी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. गत काही वर्षांच्या तुलनेत शहरात पहिल्यांदाच पाण्याच्या टाकीची विक्रमी विक्री झाली आहे. केवळ मार्च महिन्यांत २५.५० लाख लिटर पाण्याच्या टाकीची विक्री झाली आहे.
सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहतीत टाकी निर्मितीचे दोन कारखाने आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने शिवाय मालही वेळीच उपलब्ध होत असल्याने येथूनच टाकी खरेदीला वर्ध्यातील व्यावसायिक पसंती देतात. शहरात टाकी विक्री करणारे १० ते १५ व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांकडे ३००, ५००, ७५० आणि १ हजार, १ हजार ५०० आणि दोन हजार लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या टाकी २ थर, तीन थर प्रमाणे उपलब्ध आहेत.
केमिकलच्या ड्रमचाही वापर
अनेकांना कंपन्यांच्या टाक्या घेणे परिस्थितीमुळे शक्य होत नसल्याने त्यांच्याकडून केमिकलकरिता वापरल्या जाणाºया प्लास्टिक ड्रमची पाणी साठवणुकीकरिता खरेदी केली जात आहे. हे ड्रम बाजारपेठेतील पटेल चौक, इतवारा बाजार परिसरात २५०, ३०० आणि ४५० रुपयांत उपलब्ध होत असून हा खर्च सर्वसामान्यांना झेपावणारा आहे. या ड्रमचीही मागणी प्रचंड वाढली आहे.
पाणीटंचाईमुळे यंदा पाण्याच्या टाक्यांची गत काही वर्षांच्या तुलनेत मोठी मागणी वाढली आहे. यावर्षी केवळ मार्च महिन्यात टाक्यांची तीन पटीने विक्री झाली. पुढे मे महिना आहे. टाक्यांची आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे.
फिदा हुसेन अलीभाई
व्यावसायिक, वर्धा.