मिनी मंत्रालय आता ५२ सदस्यांचे

By Admin | Published: August 21, 2016 01:09 AM2016-08-21T01:09:11+5:302016-08-21T01:09:11+5:30

जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर जि.प. गट आणि गणांची पुनर्रचना होणार हे जवळपास निश्चित झाले होते.

Mini ministry now has 52 members | मिनी मंत्रालय आता ५२ सदस्यांचे

मिनी मंत्रालय आता ५२ सदस्यांचे

googlenewsNext

वर्धा तालुक्यात तीन नवे जि.प. गट उदयास : आष्टी व कारंजा तालुक्यातून प्रत्येकी एक गट कपात
राजेश भोजेकर वर्धा
जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर जि.प. गट आणि गणांची पुनर्रचना होणार हे जवळपास निश्चित झाले होते. अखेर हे बदल आगामी जि.प. व प.सं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. नव्या संररचनेनुसार वर्धा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या एकने वाढली असून ती ५१ वरुन ५२ करण्यात आली आहे. तर आष्टी आणि कारंजा तालुक्यातून प्रत्येकी एक गट आणि दोन गण कमी करतानाच वर्धा तालुक्यातील गटांची संख्या ११ वरुन तब्बल १४ वर गेली आहे. स्वाभाविक, गणांची संख्या २२ वरुन २८ असणार आहे.
नव्याने करण्यात आलेली ही गट व गणांची संरचना २०१७ मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या गट व गणांच्या निवडणुकासाठी असणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यातील २६ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या २९७ पंचायत समित्यांची मुदत सन २०१७ मध्ये संपत असल्याने तत्पूर्वी त्यांच्या सार्वत्रिक निवडणूका होऊ घातल्या आहे. या अनुषंगाने २०११ च्या जनगणनेवर आधारीत जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने १८ आॅगस्ट २०१६ च्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ९(१) नुसार जिल्हा परिषदेकरिता देय असलेली एकूण सदस्य संख्या निश्चित केलेली आहे. या अनुषंगाने पंचायत समितीनिहाय विभागणी करणे, आरक्षण ठरविणे, पंचायत समितीस देय असलेल्या जागा व त्यांचे आरक्षण निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना प्रारुप रचनेचा प्रस्ताव (अनुसूचित जाती व जमातीकरिता आरक्षित प्रभागासह) तयार करुन विभागीय आयुक्तांना सादर करावयाचा असल्याचे निवडणूक आयोगाच्या पत्रात म्हटले आहे. वर्धा जिल्हा परिषदेची संख्या ५१ वरुन वाढवून ५२ करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आष्टी, कारंजा, सेलू आणि समुद्रपूर या चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर झाले. तेथे नंतर निवडणूकाही घेण्यात आल्या. उल्लेखनीय, नगर पंचायत झालेल्या ग्रामपंचायती पूर्वी जि. प. गट होत्या. आगामी जि.प. निवडणुकीसाठी या गटांऐवजी नवे गट उदयास येईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने आष्टी व कारंजा हे गट कमी केले आहे. आष्टी तालुक्यातून चार ऐवजी तीनच आणि कारंजातून पाच ऐवजी चारच सदस्य जि.प.त जाणार आहे. १८ पैकी १४ पंचायत समिती सदस्यच निवडतील. परिणामी या तालुक्यातील विद्यमान जि.प. व पं.स. सदस्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. वर्धा तालुक्यात ११ ऐवजी आता १४ जि.प.सदस्य व २८ पं.स. निवडले जाईल. यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी चालून आल्यामुळे अनेकांना जि.प. व पं.स. सदस्य पदाचे डोहाळे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Mini ministry now has 52 members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.