तापाने फणफणणाऱ्या वर्धा जिल्ह्यात ‘कोविड टेस्ट’ नाममात्रच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 05:16 PM2021-09-13T17:16:42+5:302021-09-13T17:20:21+5:30
Wardha News कोविड, तसेच डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरल फ्लू यांच्या प्राथमिक लक्षणांत ताप हा काॅमन असूनही तापाने फणफणणाऱ्या वर्धा जिल्ह्यात कोविड टेस्ट नाममात्रच केल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविडची दुसरी लाट ओसरत वर्धा जिल्हा कोविडमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असतानाच, सध्या शहरी व ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया, तसेच व्हायरल फ्लूने डोके वर काढल्याचे वास्तव आहे. कोविड, तसेच डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरल फ्लू यांच्या प्राथमिक लक्षणांत ताप हा काॅमन असूनही तापाने फणफणणाऱ्या वर्धा जिल्ह्यात कोविड टेस्ट नाममात्रच केल्या जात आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने, वर्धा जिल्ह्यावर कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Minimum 'Covid test' in Wardha district )
जिल्ह्यात सध्या केवळ तीन ॲक्टिव्ह कोविड बाधित आहेत. असे असले, तरी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगणघाट आणि आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय, तसेच आठही तालुक्यांतील खासगी रुग्णालये सध्या तापाच्या रुग्णांनी फुल आहेत. कोविड संकट मोठे असल्याने नवीन रुग्ण वेळीच ट्रेस व्हावा, म्हणून कोविड चाचण्या कुठेही कमी होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना शासनाच्या आहेत; परंतु ५ ते ११ सप्टेंबर या काळात वर्धा जिल्ह्यात केवळ १ हजार ५३० कोविड चाचण्या करण्यात आल्या. यात गोल्ड स्टॅण्डर्ड समजली जाणारी आरटीपीसीआर पद्धतीच्या चाचण्या नाममात्रच आहेत. विशेष म्हणजे, कोविडची दुसरी लाट वर्धा जिल्ह्यात उच्चांकी गाठत असताना, जिल्ह्यात प्रत्येक दिवशी किमान तीन हजार कोविड चाचण्या केल्या जात होत्या; परंतु सध्या नाममात्रच कोविड चाचण्या करून सोपस्कार पूर्ण केले जात आहेत.
शनिवारी भाेपळा
प्राप्त माहितीनुसार, ५ सप्टेंबरला २६८, ६ सप्टेंबरला ४६, ७ सप्टेंबरला २६३, ८ सप्टेंबरला २५०, ९ सप्टेंबरला ३१९, १० सप्टेंबरला जिल्ह्यात ३८४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली, तर शनिवार ११ सप्टेंबरला एकाही व्यक्तीची कोविड चाचणी करण्यात आली नाही.
रुग्णांमध्ये बच्चे कंपनींचाही समावेश
जिल्हा सध्या तापाने फणफणत असून, तापाच्या रुग्णांमध्ये छोट्या मुला-मुलींचा मोठ्या संख्येने समावेश आहे. रुग्णालयांमधील बालरोग विभागात सध्या सर्वच रुग्ण खाटा तापाची लागण झालेल्या बालरुग्णांमुळे फुल आहेत.