सेवाग्राम रेल्वेस्थानक मॉडेल करण्याला मंत्रालय सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:40 PM2019-07-24T23:40:49+5:302019-07-24T23:41:09+5:30
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे नियोजन होत असून यामध्ये महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राम आश्रमा जवळ असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाला जागतीक दर्जाचे प्रवासी केंद्र आणि मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून............
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे नियोजन होत असून यामध्ये महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राम आश्रमा जवळ असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाला जागतीक दर्जाचे प्रवासी केंद्र आणि मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून विकसीत करावे या सोबतच गांधीजींची कर्मभूमी सेवाग्राम ते जन्मभूमी पोरबंदर येथील संदिपनी आश्रम रेल्वे सेवेनी जोडले जावे, अशी मागणी खा. तडस यांनी केली.
खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष त्याकडे वेधले. रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी सदर प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले की, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त अत्यंत चांगला प्रस्ताव खा. तडस यांनी मांडला आहे. रेल्वे मंत्रालय नक्कीच या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रस्ताव पुर्णत्वास नेईल, असे स्पष्ट केले.
आपल्या लोकसभेतील प्रश्नोत्तर काळाच्या उत्तरातून स्पष्ट करताना रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त विविध कार्यक्रम आणि परीयोजना देश भर राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच झालेला आहे. खासदार रामदास तडस यांच्या सूचना आणि निवेदन अत्यंत महत्वपूर्ण असून त्यांच्या मागणीवर रेल्वे मंत्रालय नक्कीच सकारात्मक विचार करून वेळीच योग्य निर्णय घेईल, असेही सांगितले. सदर विषय पूर्णत्वास गेल्यास सेवाग्राम रेल्वे स्थानकाचा चेहरा बदलणार आहे.
रेल्वे मार्गाचा विद्युतीकरण प्रस्ताव केंद्र शासन २०२२ पर्यंत पूर्ण करणार
संसदेमध्ये आपल्या पुरवणी प्रश्न क्र. २ नमुद करताना खासदार रामदास तडस यांनी मुद्दा उपस्थित केला की, वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गाचे कार्य २०१४ नंतर पंतप्रधान कार्यालयाच्या प्रगती पोर्टलच्या देखरेखीखाली अत्यंत चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर आहे. हा नवीन रेल्वे मार्ग प्रारंभी डिझेल इंजिनचा उपयोग कार्यान्वीत करणे प्रस्तावीत आहे. परंतु, पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन भविष्यामध्ये वर्धा-नांदेड नवीन रेल्वे मार्ग विद्युतीकरणासह पूर्ण करण्यात केंद्र शासनाचे नियोजन आहे काय, याबाबत रेल्वे मंत्री यांच्याकडे स्पष्टीकरण मागीतले. सदर पुरवणी प्रश्नाला उत्तर देतांना रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी स्पष्ट केले की, २०२२ पर्यंत भारतातील जवळपास सर्व रेल्वे मार्ग वर्धा-नांदेड प्रकल्पासह पूर्ण करण्याकरिता शासन कटीबद्ध आहे. शिवाय २०२२ पर्यंत हा मार्ग विद्युतीकरणाकरिता प्राधान्याने विचारात घेऊन पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.
आज उपस्थित केलेल्या वर्धा लोकसभा क्षेत्रातील दोन महत्वाचे विषय लोकसभेत चर्चा झाल्याने निश्चितच मार्गी लागतील आणि त्याकरिता माझा सतत पाठपुरावा सुरु असेल. वर्धा लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करू. शिवाय नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यासाठीही प्रयत्न केले जाईल, असे खा. रामदास तडस यांनी स्पष्ट केले.