अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले
By admin | Published: June 26, 2014 11:28 PM2014-06-26T23:28:12+5:302014-06-26T23:28:12+5:30
आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १८ वयोगटातील ६६ टक्के मुला-मुलींनी
वर्धा : आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १८ वयोगटातील ६६ टक्के मुला-मुलींनी अश्लील वेबसाईटस् पाहत असल्याचे कबूल केले. एवढेच नव्हे तर अन्य मित्र- मैत्रिणींनाही ते व्हिडिओ, फोटो शेयर करीत असल्याचेही सांगितले. ही धक्कादायक माहिती, मुंबईतील कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने राज्यातील सहा जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. इंटरनेटच्या मायाजालात अल्पवयीनांचे बाल्यमन हरवत असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे वेळीच सावधान झालेले बरे.
‘मोबाईल आणि इंटरनेटचा वापर आणि किशोरवयीन बालके’ हा सर्वेक्षणाचा विषय होता. यात राज्यातील मुंबई, कल्याण, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्यांत १० ते १९ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीनांचा सर्व्हे करण्यात आला. यात १० ते १४ वर्षे वयोगटातील १५२, तर १५ ते १९ वर्षे वयोगटातील ३३६ व १९ वर्षांवरील १२ जणांचा समावेश होता. यात १९२ मुली व ३०८ मुलांना सहभागी करण्यात आले. १९८ मुला- मुलींनी वयाच्या १० वर्षांपासून, तर ३०२ जणांनी वयाच्या १५ व्या वर्षांपासून मोबाईल, इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली. ६७ टक्के मुला- मुलींनी सांगितले की, त्यांना ओळखीच्या व काहीवेळा अनोळखी व्यक्तीकडून अश्लील एसएमएस, एमएमएस प्राप्त झाले आहेत. ७४ टक्के जण इंटरनेटचा वापर गाणे, गेम, व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी करीत आहेत. ५५ टक्के म्हणाले की, शाळेचा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी इंटरनेटचा वापर करीत आहेत, तर ६० टक्के जण चॅटिंग करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. त्यातही ७७.६ टक्के मुले- मुली सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करीत आहेत. धक्कदायक बाब म्हणजे यातील ६६.२ टक्के मुला- मुलींना अश्लील फोटो, व्हिडिओ क्लिप प्राप्त झाले ते त्यांनी आपल्या मित्र- मैत्रिणींनाही पाठविले. एवढेच नव्हे तर त्यांनी पोर्न वेबसाईट पाहिल्याची कबुली दिली. ४२.२ टक्के अल्पवयीन दररोज नियमितपणे इंटरनेटचा वापर करीत आहेत. बहुतांश जण आपल्या पालकांच्या अनुपस्थितीत इंटरनेटचा वापर करीत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले.
सर्वेक्षणातून अशी माहिती मिळाली की, गंमत म्हणून अनेकांच्या हातात आपल्या आई- वडिलांनी मोबाईल दिला. काही मुले तर पोर्न फिल्मच्या आहारी गेले आहेत. एवढेच नव्हे तर दिवसातून एकदातरी नवीन फिल्म बघितल्याशिवाय या मुलांची बेचैन थांबत नाही.
पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल द्यावा; पण आपल्यासमोर तो हातळावा अशी सक्ती करा, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.