दिघी (होणाडे) येथील गौण खनिज चोरीकडे महसूलचे दुर्लक्ष

By admin | Published: July 9, 2017 12:42 AM2017-07-09T00:42:43+5:302017-07-09T00:42:43+5:30

आर्वी तालुक्यातील दिघी (होणाडे) या गावाच्या जुन्या वस्तीला लागून असलेल्या महसूली जागेतून ५०० टिप्परपेक्षा

Minor mining theft in Digai (Honade) is a neglect of revenue | दिघी (होणाडे) येथील गौण खनिज चोरीकडे महसूलचे दुर्लक्ष

दिघी (होणाडे) येथील गौण खनिज चोरीकडे महसूलचे दुर्लक्ष

Next

ग्रामस्थांना आश्चर्य : माहिती देऊनही कारवाईस टाळाटाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी तालुक्यातील दिघी (होणाडे) या गावाच्या जुन्या वस्तीला लागून असलेल्या महसूली जागेतून ५०० टिप्परपेक्षा अधिक मुरूम अनधिकृतरीत्या खोदून नेण्यात आला. रेती चोरून नेणाऱ्यांनी आता आपला मोर्चा मुरूम चोरीकडे वळविल्याचे दिसून येत आहे. याबाबत माहिती देऊनही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आर्वी तालुक्यातील दिघी या गावाच्या शेजारून वर्धा नदी वाहते. येथील घाटाचा महसूल विभागाने लिलाव केला नाही. तेथे असलेल्या रेतीवर चोरट्यांनी डोळा ठेवून अनधिकृतरित्या प्रचंड प्रमाणात रेती चोरून नेली. चोरलेली रेती ही दिघी (होनाडे) येथील रेती घाटातील आहे. याबाबतची माहिती असताना आर्वीचा महसूल विभाग कारवाई करण्यास तयार नाही. रेतीघाटावर जाण्याकरिता असलेल्या पांदण रस्त्याच्या शेजारी महसूल विभागाची मोठी जागा आहे. या जागेत मुरुमाचे प्रमाण अधिक असल्याने रेती चोरांनी तेथील मुरूम उत्खन्नाला प्रारंभ केला आहे. चोरलेला मुरुम काही प्रमाणात निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याशेजारी रस्त्यासाठी वापरला गेला तर काही मुरूम रेती वाहून नेणाऱ्या वाहनांना चांगला रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून रस्त्यावर टाकण्यात आला. मागील ५ ते ७ दिवसांत पोकलँडच्या साह्याने अविरत खोदकाम करीत मोठा खोल खड्डा तयार करून ठेवण्यात आला आहे. ही बाब दिघी येथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बुधवार पोकलँड व ट्रक घटनास्थळावर पकडला. सरपंचांनी उपविभागीय महसूल अधिकारी यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. तेव्हा महसूल अधिकारी मी प्रवासात आहे, असे सांगत होते. तहसीलदारांचा दूरध्वनी उचलला गेला नाही. नायब तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना माहिती दिली. त्यांनी कारवाई करतो, असे सांगितले; पण घटनास्थळी कुणीही गेले नाही. रात्री ग्रामस्थांनी ट्रकच्या चाकांतील हवा काढली व घरी निघून आले. चोरट्यांनी ही संधी साधत घटनास्थळावर उभे असलेले पोकलँड पळविले व ट्रक तेथेच ठेवला. गुरुवारी दुपारपर्यंत महसूल विभागाचा तलाठी, मंडळ अधिकारी वा नायब तहसीलदार पोहोचले नाही. अखेर पुन्हा तहसीलदार पवार यांना दूरध्वनीवर विचारणा करण्यात आली. तेव्हा मंडळ अधिकारी पंचनामा करतील व ते जाणार होते, असे उत्तर देण्यात आले. लाखो रुपयांच्या गौण खनिजाची दिवसाढवळया चोरी होत आहे. ग्रामस्थ वाहने पकडून घटनेची माहिती देत आहे; पण अधिकारी कारवाई करण्यास तयार नाही, अशी दयनिय स्थिती आर्वी महसूल विभागाची आहे.
गौण खनिज चोरून नेणाऱ्यांची माहिती महसूल विभागाला आहे. त्यांच्यासोबत महसुली अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. यामुळेच रेती वा गौण खनिज चोरी रोखण्यासाठी आमचे बंद डोळे उघडणार नाही, असा मुकसंदेश अधिकारी देत असल्याचे दिसते. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Minor mining theft in Digai (Honade) is a neglect of revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.