जनआरोग्य योजना ठरताहेत मृगजळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:47 PM2019-03-26T23:47:53+5:302019-03-26T23:48:17+5:30
गोरगरीब व जनसामान्यांना विनामूल्य आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा मोठा गाजा होत आहे. परंतु अस्थी रुग्ण वगळता अन्य कोणत्याही रुग्णाला या योजनेचा लाभ येथील उपजिल्हा रु ग्णालयातून मिळत नसल्याची ओरड होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : गोरगरीब व जनसामान्यांना विनामूल्य आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा मोठा गाजा होत आहे. परंतु अस्थी रुग्ण वगळता अन्य कोणत्याही रुग्णाला या योजनेचा लाभ येथील उपजिल्हा रु ग्णालयातून मिळत नसल्याची ओरड होत आहे.
प्रशासनाने वेळीत दखल घेत येथील १०० खाटांच्या या उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक डॉक्टरांची उपलब्धी करावी अन्यथा या योजना कागदावरच राहणार आहे. येथील ट्रामा केअर यूनिट मध्ये ५ व उपजिल्हा रुग्णालयात १३ अशी १८ डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. या युनिटचे एक अस्थीरोग तज्ज्ञ एक वर्षांपासून व एक भूलतज्ज्ञ गत ५ वर्षापासून कार्यरत असून इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. या १०० खाटांचे उपजिल्हारुग्णालयात ८ डॉक्टर हजेरी पटावर आहे. यापैकी एक डॉ. कपूर मागील चार वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर आहेत. उर्वरित डॉक्टरांमध्ये प्रमुख मेडिसीन, शल्य चिकित्सक, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञांचा अभाव आहे. उपलब्ध डॉक्टरकडून २४ तास रुग्णसेवा व जवळपास १००० बाह्यरुग्ण तपासणी केल्या जात आहे. डॉ. राहुल भोयर व डॉ.आशिष लांडे या अस्थिरोग तज्ज्ञांनी मागील ५ महिन्यात ५० च्या वर शस्त्रक्रिया केल्या असून लहानात लहान फ्रॅक्चरपासून सांधाबदली पर्यंतच्या अस्थीरोग शस्त्रक्रिया विनामूल्य होत आहेत.
मेडिसीन, शल्य चिकित्सक, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञांचा अभाव असल्याने महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य शासन योजना कागदावर दिसून येत आहे. त्यामुळे हिंगणघाट समुद्रपूर तालुक्याच्या या उपविभागातील नागरिकांना उपचारासाठी सावंगी मेघे, सेवाग्राम व जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. अनेकांना वेळीच उपचार न मिळाल्याने मोठ्या रुग्णालयात पोहोचण्याआधीच जीव गमविण्याच्या घटना सातत्याने सुरु आहे. अशा स्थितीत मनुष्यबळ नसल्याने रुग्णांना मात्र नाईलाजास्तव स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो. वेळप्रसंगी कर्जबाजारी होऊन जीव वाचविण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा स्थितीत शासनाची विनामूल्य आरोग्य उपचार योजना तज्ञ डॉक्टरांअभावी फसवी ठरत आहे.
नागपुर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ व चंद्रपूर राज्यमार्ग तसेच दिल्ली-कन्याकुमारी लोहमार्गावरील हिंगणघाटच्या परिसरात दरवर्षी अपघातांमध्ये मुत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अपघातातील जखमी रुग्णांना अतिदक्षता विभागात पहिल्या तासात तातडीचे प्राथमिक उपचार अत्यावश्यक आहे. याची शासनाने दखल घेऊन २० खाटांचे ट्रामा केअर युनिट मंजूर केले. याला वीस वर्षाचा कालावधी लोटला तरी ते पुर्णत्वास गेले नसल्याने आरोग्य यंत्रणा कशी ठेपाळली याचे हे उदाहरण ठरत आहे.
वीस वर्षांपासून हिंगणघाटवासीयांना ट्रामा केअर युनिटची प्रतीक्षा
येथे वीस वर्षांपूर्वी २० खाटांचे ट्रामा केअर युनिट मंजूर केले होते. २०१२ मध्ये ७० लाखाच्या ट्रामा केअर युनीटच्या इमारतीचे बांधकाम सुरू होऊन ५ वर्षापूर्वी पूर्णत्वास आले. परंतु अनेक त्रुटी अभावी ट्रामा केअर अजूनही लोकार्पणाचे प्रतीक्षेत आहे.
सोबतच १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयातही अनेक डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने कामाचा भार वाढत आहे. तसेच हिंगणघाट व समुद्रपूर हे मोठे शहर असून परिसरातील खेड्यातून नागरिकही उपचारासाठी येतात. परंतू अपुऱ्या अधिकाऱ्यांअभावी त्यांना योग्य उपचार मिळत नाही.