आदिवासी शिष्यवृत्ती व घरकूल योजनेत गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:08 PM2018-09-17T23:08:32+5:302018-09-17T23:08:50+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांकरिता असलेली सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती, अकरावीपासून पुढे भारत सरकार शिष्यवृत्ती व शबरी घरकुल योजनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एसी, एसटी शिक्षण हक्क परिषदेने केला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, प्रकल्प अधिकारी शुभांगी सपकाळ, आदिवासी विकास विभाग (नागपूर) व जि.प. शिक्षण विभागाविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आदिवासी विद्यार्थ्यांकरिता असलेली सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती, अकरावीपासून पुढे भारत सरकार शिष्यवृत्ती व शबरी घरकुल योजनेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एसी, एसटी शिक्षण हक्क परिषदेने केला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, प्रकल्प अधिकारी शुभांगी सपकाळ, आदिवासी विकास विभाग (नागपूर) व जि.प. शिक्षण विभागाविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणात सबळ पुरावे मिळाल्यास संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करू, असे आश्वासन ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी दिल्याचे परिषदेच्यावतीने सांगण्यात आले आहे. या योजनांमधील भ्रष्टाचाराविषयी वारंवार निवेदन देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष नितीन मडावी यांच्यासमोर सर्व पुराव्यांसह प्रकरणे ठेवल्यानंतरही गैरव्यवहार करणाऱ्यांविरूद्ध कारवाई झाली आहे. आदिवासी मंत्री विष्णू सावरा व आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याशी दीड तास चर्चा होऊनही या प्रकरणात कुठलाच मार्ग निघाला नाही. परिणामी, शेवटचा पर्याय म्हणून संघटनेने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे पत्रकात म्हटले आहे.
संघटनेच्या वतीने २३ मे २०१७ ते २६ जून २०१७ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण करण्यात आले. या उपोषणात संयोजक मारोती उईके अत्यवस्थ झाल्याने त्यांना सेवाग्राम रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. १२ एप्रिल २०१७ ला जिल्हाधिकारी यांच्या कक्षात अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्य माया इवनाथे यांच्या समक्ष हा प्रश्न मांडण्यात आला होता. परंतु, त्यानंतर कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाही. त्यामुळे अखेरीस अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी.एस. थूल यांच्याकडेही तक्रार सादर करण्यात आली आहे.