कंत्राटदारांकडून दिशाभूल; ‘वेस्ट मटेरियल’ रस्त्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:43 PM2019-03-31T23:43:50+5:302019-03-31T23:44:15+5:30
वर्धा-हिंगणघाट या दीडशे कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामात कंत्राटदाराकडून वेस्ट मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. याबाबत वृत्त प्रकाशित करताच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कंन्सलटंट कंपनीच्या टीम लिडरला सूचना करून वेस्ट मटेरियल बाहेर काढण्याचे आदेश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा-हिंगणघाट या दीडशे कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामात कंत्राटदाराकडून वेस्ट मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. याबाबत वृत्त प्रकाशित करताच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कंन्सलटंट कंपनीच्या टीम लिडरला सूचना करून वेस्ट मटेरियल बाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे दोन दिवसांनी कंत्राटदार व कंन्सलटंट कंपनीकडून वेस्ट मटेरियल काढल्याचेही सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात वेस्ट मटेरियल रस्त्यातच दाबल्याचे चित्र आहे.
वर्धा ते हिंगणघाट या ३५ किलोमीटर महामार्गाच्या रुंदीकरणाकरिता शासनाकडून जवळपास दीडशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या कामाचा कंत्राट आरटीसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिला असून कामाची सुरुवातही करण्यात आली आहे. वायगाव (निपाणी) ते सेलू (काटे) दरम्यान रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून रुंदीकरणाचे काम केले जात आहे. या खोदकामात गिट्टी व मुरुमाऐवजी डांबरी रस्त्याचे वेस्ट मटेरियल वापरण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या प्रकाराला कंत्राटदारासह क न्सलटंट कंपनी व महामार्गाच्या उपविभागीय अभियंत्यांनीही दुजोरा दिला.
बायमिस्टेक एक किलो मीटरदरम्यान वेस्ट मटेरियल वापरले असून ते काढून घेतले जाईल, असे सांगितले होते. दोन दिवसांनंतर कंत्राटदाराने ते मटेरियल काढल्याचेही कंन्सलटंट कंपनीचे टिम लिडर व उपविभागीय अभियंत्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात मार्गावर जाऊन पाहणी केली असता वेस्ट मटेरियल काढण्याऐवजी रस्त्यात दाबलेले दिसून आले. यामुळे कंन्सलटंट कंपनी कंत्राटदारासोबतच असून उपविभागीय अभियंता उंटावरून शेळ्या हाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.
रस्त्याची चौकशी करण्याची मागणी
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी एका क न्सलटंट कंपनीकडे सोपविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आपले हात वर करून मोकळे होत आहे. क न्सलटंट कपनीही कंत्राटदाराची पाठराखण करीत असल्याचे या प्रकारावरून लक्षात येत आहे. एक किलोमीटर दरम्यान वेस्ट मटेरियल वापरण्यात आले. ते काढणार असल्याचे सांगूनही न काढता तसेच कायम ठेवल्याने हिंगणघाट ते वायगावपर्यंतच्या रस्त्यात इतरही ठिकाणी वापरण्याची शक्यता बळावली असून या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
मला कंन्सलटंट कंपनीचे टिम लिडर चौकसे यांनी कंत्राटदाराकडून वेस्ट मटेरियल काढून घेतल्याचे सांगितले. पण, मी प्रत्यक्षात जाऊन पाहिले नाही. आता या कामाची पाहणी करून काय वास्तविकता आहे, ती तपासून कारवाई केली जाईल.
पी. बी. तुंडुलकर,उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग
कंत्राटदाराला रस्त्यावर वापरलेले वेस्ट मटेरियल काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्याने काढलेही, परंतु मातीत दबलेले सर्वच वेस्ट मटेरियल काढणे शक्य होत नाही. काही प्रमाणात ते शिल्लक राहिले असावे. परंतु प्रत्यक्ष काय स्थिती आहे हे पाहिल्या शिवाय सांगता येणार नाही.
व्ही. के. चौकसे,
टिम लिडर