कृषी सहायक महिन्याभरापासून बेपत्ता
By admin | Published: September 18, 2015 01:55 AM2015-09-18T01:55:40+5:302015-09-18T01:55:40+5:30
शेती, शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून कृषी सहायक कार्यरत असतात. त्यांच्यामार्फत अनेक योजना शेतकरी, ग्रामस्थांना कळतात; पण गत एक महिन्यापासून तेच बेपत्ता आहेत.
मार्गदर्शनाचा अभाव : शेती कार्यशाळा घेण्यासही बगलच
तळेगाव (श्या.पंत.) : शेती, शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून कृषी सहायक कार्यरत असतात. त्यांच्यामार्फत अनेक योजना शेतकरी, ग्रामस्थांना कळतात; पण गत एक महिन्यापासून तेच बेपत्ता आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शनच मिळत नसल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तळेगाव, रानवाडी व बेलोरा खुर्द या साझाकरिता एक कृषी सहायक असून ते गत एक ते दीड महिन्यापासून बेपत्ता आहे. शेतकरी कार्यालयात चकरा मारून थकले; पण कृषी सहायक मिळत नाही. तळेगाव-आष्टी मार्गावरील कृषी चिकित्सालयाचाही बेताल कारभार आहे. गोदामाची चौकशी झाल्यास तेथे शेतकऱ्यांना शासनाकडून येणारी कृषी रसायने, कृषी साहित्य नांगर, एक दात्याचे पेरणीयंत्र, कलमा, पाईप धूळखात पडून आहे. २०१३-१४ मध्ये फळबाग लागवडीसाठी कलमांचे प्रस्ताव सादर केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही लाभ देण्यात आला नसल्याच्या तक्रारी आहेत. तो लाभ परस्पर कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उचलल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तळेगाव, काकडधरा, रामदरा, शिर्री, रानवाडी, बेलोरा खुर्द या साझामध्ये सुमारे दहा हजार शेतकरी आहे. खरीपाची पिके असल्याने शेतकरी पूर्णत: कृषी विभागावर अवलंबून आहे; पण त्यांना योग्यवेळी मार्गदर्शन मिळत नाही. दरवर्षी मार्गदर्शनार्थ शेतीशाळा घेतल्या जात होत्या; पण यंदा शेती कार्यशाळा कागदोपत्री दाखवून शासनाची दिशाभूल केल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले.
आमदार अमर काळे यांनी कारंजा शहरातील कृषी विभागाच्या गोदामांची पाहणी केली. यात अनियमितता आढळून आली. असाच प्रकार आष्टी तालुक्यातही आहे. आष्टी तालुका कृषी विभागांतर्गत येणाऱ्या तळेगावच्या रोपवाटीकेमधील गोदामाची पाहणी केल्यास तेथेही शेतकऱ्यांना वितरित न केलेले कृषी साहित्य बेवारस पडून असल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)