जिल्ह्यात धुवाधार पाऊस; अतिवृष्टीमुळे पूल वाहून गेला, अनेक मार्ग बंद
By अभिनय खोपडे | Published: July 22, 2023 11:33 AM2023-07-22T11:33:56+5:302023-07-22T11:40:26+5:30
नदी-नाल्यांना पूर : नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वर्धा : तालुक्यातील बेलगांव येथे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे नदीवरील पुल पूर्णपणे वाहून गेला. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हिंगणघाट तालुक्यातील आलमडोह ते अल्लीपूर मार्ग यशोदा नदी प्रवाहामुळे कालपासून बंद आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.
शुक्रवारी पहाटेपासूनच सर्वत्र कोसळधार असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सेलू तालुक्यातील धानोली मेघे ते बेलगाव या गावांना जोडणाऱ्या लोकवर्गणीतून बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भाग वाहून गेला आहे. या मार्गावरून फारशी वाहतूक होत नाही. मार्गाचा वापर शेतकरी व मजूर मुख्यत्वे करतात. पर्यायी मार्ग तीनशे मीटर अंतरावर महामार्गावरून उपलब्ध आहे. वर्धा तालुक्यातील पवनार सेवाग्राम रोडवर नागझरी नाल्यावरील पुल पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. सुरक्षेच्याकारणास्तव बॅरिगेट लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोसळधार पावसामुळे जलाशयांच्या पाणीपातळी वाढ झाल्याने पाण्याचा विसर्गही सुरू झाला आहे. परिणामी नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.