आमदार ‘ॲक्टिव्ह मोड’; प्रशासन ‘व्हायब्रेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 05:00 AM2022-05-09T05:00:00+5:302022-05-09T05:00:06+5:30
शनिवारी सायंकाळी आमदार डॉ. पंकज भोयर आर्वीनाका परिसरात एका कार्यक्रमानिमित्त गेले असता उपस्थित नागरिकांनी हा सर्व गैरप्रकार त्यांच्यापुढे कथन केला. त्यामुळे आमदारांनीच थेट तेथील जुगार अड्ड्यावर धाड टाकताच पोलीस प्रशासनही कामाला लागले. पोलिसांनी रात्रीच कारवाई करून दोघांना अटक केली. दुसऱ्या दिवशी रविवारी सुटी असतानाही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील आर्वीनाका परिसरातील वसंत प्राथमिक शाळेच्या बाजूला असलेल्या नगरपालिकेच्या संकुलालगत अतिक्रमण करून अवैधरीत्या जुगार भरविला जात होता. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने नागरिकही त्रस्त झाले होते. अखेर नागरिकांच्या तक्रारीअंती आमदार डॉ. पंकज भोयर यांनीच थेट जुगार अड्ड्यावर धाड टाकली. आमदारांच्या कामगिरीने प्रशासनालाही जाग आली असून, साऱ्यांचीच धावपळ उडाली. पोलिसांनी दोघांना अटक केली, तर नगरपालिकेनेही अतिक्रमणावर गजराज चालविला.
वसंत प्राथमिक शाळेच्या बाजूला असलेल्या नगरपालिकेच्या संकुलालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून खुलेआम जुगार व चेंगळ भरविली जात होती. या परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याने या अतिक्रमणामुळे अवैध धंदेही बोकाळत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याने येथील अतिक्रमण काढण्याची मागणी नगरपालिकेकडे करण्यात आली होती; पण नगरपालिकेनेही या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या अतिक्रमणातून अवैध धंदे फोफावत राहिले. पोलिसांचीही या जुगार अड्ड्यावर नजर गेली. शनिवारी सायंकाळी आमदार डॉ. पंकज भोयर आर्वीनाका परिसरात एका कार्यक्रमानिमित्त गेले असता उपस्थित नागरिकांनी हा सर्व गैरप्रकार त्यांच्यापुढे कथन केला. त्यामुळे आमदारांनीच थेट तेथील जुगार अड्ड्यावर धाड टाकताच पोलीस प्रशासनही कामाला लागले. पोलिसांनी रात्रीच कारवाई करून दोघांना अटक केली. दुसऱ्या दिवशी रविवारी सुटी असतानाही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली. या परिसरातील सर्वच अतिक्रमण हटविण्यात आले. पालिकेने हीच कार्य तत्परता आधीच दाखविली असती तर त्या ठिकाणी अवैध धंद्यांनी मूळ पकडलेच नसते; पण नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला जागे करण्याकरिता आमदारांना पुढाकार घ्यावा लागला, अशा प्रतिक्रिया आता जनसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिले होते पालिकेला पत्र
- शहरात सध्या अतिक्रमणाच्या आडच अवैधधंदे सुरू असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटले तर तेथील अवैधधंदे आपोआपच बंद होतील. या उद्देशाने पोलीस प्रशासनाकडून शास्त्री चौक व आर्वीनाका परिसरातील नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यातच नगरपालिकेला पत्र दिले होते. अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी नगरपालिकेची असतानाही पालिकेने अद्यापही अतिक्रमण हटविले नाही. मात्र, आमदार जुगार अड्ड्यावर पोहोचताच पालिकेने दुसऱ्याच दिवशी तेथील अतिक्रमण हटविले. आता शास्त्री चौकासह इतरही ठिकाणचे अतिक्रमण पालिका हटविणार का, हा प्रश्न आहे.
जुगार व दारू अड्ड्यावर धाड टाकणे हे लोकप्रतिनिधीचे काम नाही; परंतु पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या तक्रारीअंती आम्हाला अड्ड्यावर जावे लागले. शहरामध्ये सर्रास दारूविक्री, जुगार व चेंगळ सुरू आहे. यामुळे युवापिढी यात गुरफटत असून, अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत. म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की, येत्या आठ दिवसांत शहरातील सर्व अवैध धंदे बंद करावेत, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.
- डॉ. पंकज भोयर, आमदार.
जुगार अड्ड्यावरून दोघांना अटक
- आमदारांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. आमदार अड्ड्यावर पोहोचल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत कारवाई आरंभली. पोलिसांनी घटनास्थळावरून श्यामसुंदर कमलकिशोर सिद्ध (३४), रा. एरिगेशन कॉलनी, पिपरी व शिवम राजू टेंभुर्णे (२६), रा. इतवारा या दोघांना अटक करून त्यांच्याकडून साहित्य व १४० रुपयांची रोख जप्त केली. ही कारवाई पूर्ण होण्यापूर्वीच काही उत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या जुन्या एका कारवाईच्या प्रेसनोटचा आधार घेत ती व्हायरल करण्याचा गैरप्रकारही केला. त्यामुळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.