शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून आमदार पोहोचले बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 09:36 PM2021-08-30T21:36:03+5:302021-08-30T21:37:33+5:30
Wardha News आर्वी तालुक्यातील शिरपूर (खडकी) शिवारात सुरू असलेल्या बंधारा कम रस्त्याच्या बांधकामासंदर्भात शेतकऱ्यांनी आमदार दादाराव केचे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आमदारांनी तेथे प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्वी तालुक्यातील शिरपूर (खडकी) शिवारात सुरू असलेल्या बंधारा कम रस्त्याच्या बांधकामासंदर्भात शेतकऱ्यांनी आमदार दादाराव केचे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आमदारांनी तेथे प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
जलसंधारण विभागामार्फत ७१ लाख २८ हजार २१४ रुपयांच्या निधीतून बंधारा कम रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम करीत असताना कंत्राटदाराने प्राकलन डावलून सदोष बांधकाम चालविले आहे. गोटा झालेले सिमेंट बारीक करून वापरल्याने कामाची वाट लागली आहे, अशी तक्रार परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. त्यामुळे आमदार दादाराव केचे यांनी कार्यकारी अभियंता यांना सूचना दिल्या. तसेच उपविभागीय अभियंता ससाणे यांच्यासह बांधकामस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. शेतकऱ्यांची तक्रार खरी ठरल्याने या बांधकामासाठी वापरलेल्या सिमेंटची गुणवत्ता तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिलेत.
जलसंधारणाच्या गुणवत्तापूर्ण कामातून शेतकऱ्यांची प्रगती साधावी, यासाठी मोठ्या प्रमाणात नवीन कामे केली जात आहे. त्यामुळे ही कामे गुणवत्ताहीन होऊ नयेत याकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावे. सोबतच विभागानेही कंत्राटदाराच्या कामावर लक्ष देण्याच्या सूचना आमदार केचे यांनी केल्या.
यावेळी बाबाराव तिरभाणे, गणेश धानोरकर, प्रदीप कोल्हे, रवींद्र पेठे, दिनेश देशमुख, अरविंद गोराडे, रमेश भलावी, वासुदेव विरुळकर आदी शेतकरी उपस्थित होते.