विदर्भात मनसेला झटका, प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले करणार राष्ट्रवादीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 12:24 PM2022-01-13T12:24:35+5:302022-01-13T12:47:46+5:30
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी मनसेला रामराम करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीशी हात मिळवण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासह ४० कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.
वर्धा : विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला(MNS) मोठा झटका बसला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले(Atul Wandile) राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) वाटेवर असून राष्ट्रवादीच्या मुंबई पक्ष कार्यालयात ते पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
अतुल वांदिले हे तैलिक महासंघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहेत. युवा आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. ते हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, आता त्यांनी मनसेला रामराम करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीशी हात मिळवण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासह ४० कार्यकर्ते उद्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. हा मनसेला विदर्भात मोठा धक्का असून राष्ट्रवादीला याचा फायदा होणार आहे.
एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्याने राज्याचा दौरा करत असताना दुसरीकडे त्यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना मनसेच्या महिला नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तर, आता वांदिलेदेखील त्याच वाटेवर असून यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मनसेपुढे मोठे आव्हान असणार आहे.