विसावा घेणाºया प्रवाशांचे मोबाईल व रक्कम लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:26 AM2017-08-28T00:26:21+5:302017-08-28T00:29:05+5:30
येथील विकास चौकानजीकच्या मानस अॅग्रो या पेट्रोल पंपावर रात्रीला विसावा घेणाºया प्रवाशांचे मोबाईल आणि रक्कम लांबविल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील विकास चौकानजीकच्या मानस अॅग्रो या पेट्रोल पंपावर रात्रीला विसावा घेणाºया प्रवाशांचे मोबाईल आणि रक्कम लांबविल्याचे समोर आले आहे. हा प्रकार शनिवारी रात्री घडला. चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला; मात्र पोलिसांनी हा प्रकार गांभिर्याने घेतला नसल्याचे दिसून आले.
या चोरीत दोन वाहनचालकांचे मोबाईल व आठशे रुपये रोख चोरीला गेले आहे. शनिवारी घडलेल्या या प्रकाराची तक्रार रविवारी सायंकाळपर्यंत दाखल करण्यात आली नव्हती. यामागचे कारण विचारल्यास पोलिसांकडून मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
प्राप्त माहितीनुसार, शेगाव येथून गजानन महाराज पुण्यतिथी कार्यक्रम आटोपून चिखल ढोकणा (उमरेड) येथील भाविक थकल्याने त्यांनी सेलू येथील मानस पेट्रोलपंपावर पोहचल्यावर गाडी उभी करून तेथे विसावा घेतला. सर्वजण अंथरुन टाकून झोपी गेले. रात्री २.२५ वाजता चोरट्याने वाहनाजवळ येवून त्याने गाडीतील मोबाईल व ८०० रुपये चोरले. पुन्हा काही मिळेल का याचा शोध घेत असताना महिलेला जाग आली. तिने सर्वांना जागे केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याचवेळी अनिल पवार रा. मेहकर (बुलडाणा) याचाही मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. जीपचालक गौतम लामसोंगे रा. चिखल ढोकणा हा सर्वांसह व अॅपेचालक पवार यांनी सेलू पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पहाटे पवार यांना तक्रार लिहून द्यायला सांगितली. मात्र जीपचालकची तक्रार लिहून घेतली नाही. या प्रकाराबाबत पोलिसांत विचारणा केल्यानंतर ठाणेदारांनी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना उपनिरीक्षक रामटेके यांना केली. यानुसार भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद केल्याचे ठाणेदारांनी सांगितले.
आलेख सुधारण्याकरिता तक्रारींकडे दुर्लक्ष ?
चोरीच्या गुन्ह्याची तक्रार दाखल करुन घेतली तर गुन्ह्याचा आलेख वाढतो. म्हणून चोरीच्या घटना घडूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार येथे होत असल्याची चर्चा आहे.
चोरीच्या घटनेची तक्रार देण्यासाठी तात्काळ फिर्यादी आले असता तक्रार घेवून गुन्हा दाखल केला नाही. शिवाय सीसीटीव्ही फुटेज गोळा केले नाही. सर्व फिर्यादी आपापल्या गावी पोहचले मात्र त्यांच्या स्वाक्षरीविना गुन्हा कसा दाखल करण्यात आला हे ही एक रहस्यच आहे.