कारमधील मोबाईलने दिला मारेकऱ्यांचा सुगावा
By admin | Published: July 20, 2016 01:39 AM2016-07-20T01:39:03+5:302016-07-20T01:39:03+5:30
समुद्रपूर तालुक्यातील हिवरा येथील माजी जि.प. सदस्य तथा सभापती छत्रपती थुटे रा. सावरखेडा यांना मारहाण करून
छत्रपती थुटे हत्याप्रकरण : पोलीस आरोपींच्या शोधात; वर्धेतून एकाला घेतले ताब्यात
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील हिवरा येथील माजी जि.प. सदस्य तथा सभापती छत्रपती थुटे रा. सावरखेडा यांना मारहाण करून घटनास्थळी कार सोडून मारेकरी पसार झाले होते. या कारमध्ये सापडलेल्या एका मोबाईलवरून या मारेकऱ्यांचा पोलिसांना सुगावा लागला आहे. त्यांची ओळखही पटली आहे. यात एकाला वर्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. इतर आरोपी सध्या कुठे आहे, याचा पत्ता नसल्याने अटकेच्या कारवाईत पोलिसांना अपयश येत असल्याचे बोलले जात आहे.
छत्रपती थुटे यांची हत्या गावातीलच इसमांनी केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. त्यांची नावेही पोलिसांना माहिती आहेत; पण तपासाची बाब म्हणून पोलिसांनी नावे सांगण्यास नकार दिला आहे. या आरोपींना अटक केल्यानंतरच छत्रपती थुटे यांच्या हत्येच्या कारणाचा उलगडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी त्यांची हत्या शेतीच्या वादातून करण्यात आल्याची चर्चा गावात आहे.
गावातून फरार या आरोपीच्या शोधात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत; पण त्यांच्या हाती अद्याप काहीच आले नाही. प्रारंभी छत्रपती थुटे यांना मारहाण करणारे दारूविक्रेते असावे, असा संशय पोलिसांना असल्याने त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला होता; मात्र वाहनात सापडलेला मोबाईल गावातीलच इसमाचा असल्याने त्याचा शोध घेतला असता तो घटनेच्या दिवसापासून गावातून फरार असल्याचे समोर आले. या संदर्भात पोलिसांनी शोध घेतला असता मोबाईलशी संबंधित युवकांनीच छत्रपती यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सुत्रांनी दिल्याने तपासाला गती आली आहे.
छत्रपती थुटे यांची हत्या अपघात दिसावा याकरिता प्रथम त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. यातून ते बचावले. ही घटना ज्या मार्गावर घडली, त्या मार्गावर हे मारेकरी मुद्दाम थांबले. धडक देणारी कार उभी दिसल्याने छत्रपती थुटे विचारणा करण्याकरिता येतील, अशी खात्री त्यांना असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. यावेळी बेदम मारहाण केल्याने थुटे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता नागपूर येथे दाखल केले असता त्यांचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी करीत शिवसैनिकांनी समुद्रपूर येथे आंदोलन करून निवेदन सादर केले होते.(प्रतिनिधी)
वर्धेत दोन दिवसांत तीन हत्या
४वर्धा जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून हत्येचे सत्रच सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन दिवसांत जिल्ह्यात तीन हत्या झाल्या आहेत. या हत्यांच्या सत्राचा प्रारंभ समुद्रपूर येथील छत्रपती थुटे यांच्या हत्येने झाला. या हत्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेणे सुरूच असताना समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (झाडे) येथे सोमवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह मिळून आला. त्याची हत्या करून मृतदेह येथे फेकण्यात आल्याचे समोर आले. त्याची ओळख पटली असून भाऊराव पूर्णचंद्र पुनवटकर रा. वडगाव (आ.) ता. वरोरा जि. चंद्रपूर असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची हत्या कुणी व कशाकरिता केली, याचा शोध समुद्रपूर पोलीस घेत आहेत.
४जिल्ह्याचे लक्ष समुद्रपूर येथील थुटे यांच्या हत्या प्रकरणाकडे असताना कारंजा (घाडगे) येथे एका मुलीने तिच्या दारूड्या पित्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. रमेश गाडरे याला दारूचे व्यसन होते. तो रविवारी दुपारी धुंदीत घरी आला. यावेळी त्याची पत्नी व मुलगी ज्योती या दोघी घरी होत्या. या दोघींशी वाद घालत रमेश याने घरातील साहित्याची फेकाफेक करणे सुरू केले. यामुळे दोघींनीही घराबाहेर पडत घर बंद केले. कालांतराने त्यांनी घराचे दार उघडले असता रमेश नग्नावस्थेत घरात मृतावस्थेत आढळला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला असता त्याची हत्या त्याच्या मुलीनेच केल्याचे समोर आले. यावरून ज्योतीला रात्री अटक करण्यात आली असून तिने हत्येची कबुली दिली.