मतदार जागृतीसाठी ‘मोबाईल व्हॅन’
By admin | Published: October 1, 2014 11:28 PM2014-10-01T23:28:20+5:302014-10-01T23:28:20+5:30
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदान नि:पक्षपाती व कुठल्याही दबावाला बळी न पडता व्हावे यासाठी निवडणूक आयोग विविध उपाययोजना करीत आहे़ आता मतदारांना मतदानासाठी
सुरेंद्र डाफ - आर्वी
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदान नि:पक्षपाती व कुठल्याही दबावाला बळी न पडता व्हावे यासाठी निवडणूक आयोग विविध उपाययोजना करीत आहे़ आता मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याकरिता आर्वी विधानसभा मतदार संघातील गावोगावी ‘मोबाईल व्हॅन’ सेवा सुरू करण्यात आली आहे़ या जनजागृती मोहिमेमुळे मतदान टक्केवारीत वाढ होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे़
निवडणूक निर्वाचन आयोगाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदान करण्यासाठी मतदारांनी स्वयंस्फूर्तपणे समोर येऊन आपला योग्य उमेदवार निवडावा तसेच मतदानाचा हक्क बजावला जावा, यासाठी आर्वी विधानसभा क्षेत्रातील गावोगावी मोबाईल व्हॅन सेवा सुरू आहे़ यावर्षी मतदारांना जागृत करण्यासाठी प्रथमच २०१४ च्या निवडणुकीत मतदानासाठी प्रचाराचे माध्यम म्हणून याचा वापर होत असून ही मोबाईल व्हॅन सध्या मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे़ सर्वच उमेदवारांच्यावतीने आपापल्या परीने सामान्य मतदारांना मतदान करण्यासाठी विविध प्रलोभने दाखविली जातात़ यावर निर्बंध घातला यावा व मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून आयोगाने मतदारांत जागृती मोहीम हाती घेतली आहे़ यासाठी शालेय विद्यार्थ्यांची रॅली, पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांना आर्वीतील गांधी चौकात शपथ देऊन त्या विद्यार्थ्यांनी शहरातील वॉर्डा-वॉर्डात जाऊन मतदारांना मतदान करा, असे आवाहन करून प्रोत्साहित करण्यात येत आहे़ मतदार संघातील प्रत्येक गावात मतदान जागृतीसाठी महसूल विभागाच्यावतीने विशेष व्यवस्था व नियंत्रण पथक तयार करण्यात आले आहे़
आर्वी-आष्टी-कारंजा तालुक्यात मतदारांच्या जागृतीसाठी चित्ररथ, मोबाईल व्हॅन सेवा सुरू आहे़ मतदारांनी कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता नि:पक्षपातीपणे मतदान करावे, असेही आवाहन करण्यात येत आहे़