महाबीजचा अजब कारभार, पेरणीसाठी दिले टोचलेले बियाणे; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 01:30 PM2022-11-11T13:30:02+5:302022-11-11T13:36:56+5:30
चण्याच्या बियाण्याला कीड, उगवणार तरी कसे?
फनिंद्र रघाटाटे
रोहणा (वर्धा) : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतशिवार खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारणच बदलले. त्यामुळे त्यांना रब्बी हंगामाने सावरता यावे, यासाठी शासनाकडून चणा पेरणीकरिता ५० टक्के अनुदानावर महाबीज कंपनीकडून बियाणे देण्यात आले. मात्र, पेरणीकरिता बॅग उघडल्यावर ते बियाणे टोचलेले, कीड लागलेले आढळून आले. हे बियाणे उगवतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
अतिवृष्टीबाधित क्षेत्रात रब्बी हंगामाकरिता शासनाकडून चणा पेरणीसाठी ३० किलो वजनाच्या बियाण्याची बॅग पन्नास टक्के अनुदानावर दिली जात आहे. ही बॅग शेतकऱ्यांना एक हजार ५०० रुपयांना मिळत आहे. पेरणीकरिता पाणी न लागलेले, दाणेदार, स्वच्छ व कीडविरहित बियाणे असावे लागते; परंतु, हे बियाणे किडीने टोचलेले आहे.
शासनाला जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना वस्तूच्या स्वरूपात मदत करायची असते तेव्हा सरकारी नियंत्रणातील महाबीज कंपनी तत्पर असते. मात्र, कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या बियाण्यांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत दीड ते दुप्पट असतात. त्यावर शासन उपकार म्हणून ५० टक्के अनुदान देते. आतादेखील चणा बियाण्याची ३० किलोची बॅग शेतकऱ्यांना दीड हजार रुपयांत दिली आहे. या बॅगची खुल्या बाजारात किंमत दोन हजार १०० रुपये आहे. यावरून विचार केल्यास हे ५० टक्के अनुदान आहे काय, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत.
बियाणे वाटपात दुकानदारांची दादागिरी
शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटामुळे आधीच विवंचनेत असतो. त्यातही शासनाकडून योग्य मदत देण्याऐवजी त्याच्या तोंडाला पाने पुसली जातात. महागाचे बियाणे खरेदी करताना त्याचे वजन आणि प्रत पाहण्याचीही उजागिरी नसते. सिलबंद बियाणे घरी नेल्यावरच ते कसे आहे, ते शेतकऱ्याला कळते. दुकानदार शेतकऱ्यांना बॅगवर छापलेले वजन दाखवून मोकळा होतो. उगवण क्षमता विचारल्यास कंपनीला जाऊन विचारा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीच्या नावावर दादागिरी सहन करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
माझी मारडा येथे शेती असून, मी नुकत्याच अनुदानावर महाबीज चणा बियाण्याच्या चार बॅग खरेदी केल्या. प्रत्यक्ष पेरणीच्या वेळी त्यातील एका बॅगमधील बियाणे किडलेले आढळले. बियाण्याची बॅग पूर्णतः सिलबंद होती. तरी आतील बियाणे निकृष्ट दर्जाचे होते. नाईलाजास्तवर ते बियाणे पेरावे लागले. आता त्यातील किती बियाणे उगवेल ते देव जाणे.
- दिलीप खरटकर, शेतकरी, मारडा