मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला
By admin | Published: June 28, 2014 12:36 AM2014-06-28T00:36:21+5:302014-06-28T00:36:21+5:30
सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकरी वर्गाचा विश्वासघात केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांनी केला आहे.
वर्धा : सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकरी वर्गाचा विश्वासघात केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांनी केला आहे.
केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत २०१४-१५ च्या खरीप हंगामासाठी शेतमालाच्या हमी भावाजी घोषणा केली आहे़ मोदी सरकारने धानाच्या हमी भावात ५० रूपये प्रती क्विंटल, कापसाच्या हमी भावात ५० रू़ क्विंटल ची वाढ केल्याचे जाहीर केले आहे़ २०१३-१४ च्या हंगामासाठी धानाचा हमी भाव १ हजार ३१० रू़ प्रति क्विंटलचा होता़ तो १ हजार ३६० रू़ जाहीर करण्यात आला आहे़ कापसाचा हमी भाव ४००० रू़ प्रति क्विंटलचा भाव होता तो ४ हजार ५० रू़ जाहीर करण्यात आला़ पण वास्तविक चित्र हे आहे की ही भाव वाढ निवडणुकीच्या पूर्वीच माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग सरकारने जाहीर केलेली आहे़
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या जाहीर सभेतून शेतकऱ्यांना खर्चावर ५० टक्के नफा हिशोबात घेवून भाव जाहीर करण्याचे वचन दिले होते़ त्याप्रमाणे धानाचा हमी भाव १ हजार ६८४ रू़ व कापसाचा हमी भाव ५ हजार १२० रू़ प्रती क्विंटल जाहीर करणे मोदी सरकारचे कर्तव्य आहे़ पण मोदी सरकारने डॉ़ मनमोहन सिंगच्या सरकारने जाहीर केलेलेच हमी भाव जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. डॉ़ मनमोहन सिंगजीच्या चुकींच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतो, असे प्रधानमंत्री मोदीजी म्हणायचे मग आता या घोषीत हमी भावात शेती नफ्याची होणार काय असा सवालही त्यांनी केला आहे.(शहर प्रतिनिधी)