वर्ध्यातील मोदींच्या सभेचे मैदान ‘मोकळे’च!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 05:56 AM2019-04-02T05:56:51+5:302019-04-02T05:57:17+5:30
मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या प्रचारार्थ वर्धा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे मैदान मोकळेच होते, अशी टीका काँग्रेस ...
मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या प्रचारार्थ वर्धा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे मैदान मोकळेच होते, अशी टीका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. तर भर उन्हात शरद पवार यांनी पाच हजाराची सभा घेऊ दाखवावी, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.
वर्धा येथील मोदींच्या सभेला गर्दीच नव्हती. अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या. मात्र तरीही मोदींनी सभेला विराट संबोधून जनतेला एप्रिल फूल केले. भाजप सरकारचा कारभार हेही एप्रिलफूल असून गेली पाच वर्षे जनतेला केवळ भूलथापा दिल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, सभेला गर्दी नसल्याचे पाहून हिरमोड झालेल्या मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका करून आपला त्रागा व्यक्त केला. मोदींच्या जुमले बाजीला जनता कंटाळली असल्याने त्यांनी सभेकडे पाठ फिरवली, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांच्या वर्धा येथील सभेला गर्दी नसल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही केली आहे. भाजपने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ४४ अंश तापमानात पाच हजार माणसांची सभा घेऊन दाखवावी असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. पळ काढणारे चौकीदार असतात या अशोक चव्हाण यांच्या टीकेला उत्तर देताना, आदर्शसारखा घोटाळा करुन दरोडा टाकणाऱ्यांना पंतप्रधानांना चोर म्हणताना काही वाटत नाही का? असा सवाल केला.
‘हे सरकार घट्ट आहे’
गुळाच्या ढेपेच्या मुंगळ्याप्रमाणे मुख्यमंत्री सत्तेला चिकटून बसले आहेत, असे बोलणाऱ्या छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर देताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे पूर्ण बहुमताचे सरकार आहे व हे सरकार घट्ट आहे. त्यामुळे आम्हाला सत्तेला चिकटून राहण्याची गरज नाही. जनतेनेच आमच्यावर संपूर्ण विश्वास टाकल्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत आहोत.