मोहताबार्इंनी घेतला १० वर्षांपासून स्वच्छतेचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:38 PM2018-09-28T22:38:19+5:302018-09-28T22:38:55+5:30
पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर या देशात स्वच्छता कार्यक्रमाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्धा नगर पालिकेने राज्य सरकारचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळविला असला तरी पालिकेचे कार्य देखावाच ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर या देशात स्वच्छता कार्यक्रमाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्धा नगर पालिकेने राज्य सरकारचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळविला असला तरी पालिकेचे कार्य देखावाच ठरले आहे. वर्धेच्या न्यू इंग्लिश हायस्कूल परिसरात गेल्या १० वर्षापासून मोहता नावाच्या या महिला स्वच्छतेचे काम करीत आहे. या शाळा परिसरात अरूंद पुल असून या पुलाजवळच कचऱ्याचा ढोला ठेवण्यात आला आहे. पुलाच्या रूंदीकरणाबाबत २२ वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या परिसरात शाळा असल्याने सर्वत्र घाण निर्माण होवून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोहता नावाच्या वृद्ध महिला दररोज कचरा जमा करून ढोल्यात टाकून त्याची विल्हेवाट लावतात. त्यांच्या या कार्यामुळे या परिसरात काही प्रमाणात स्वच्छता दिसून येते. स्वत: अतिशय दु:खी असलेल्या मोहता इतर मुलांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम चालवित आहे. मोहता यांचा मुलगा सुशील हा इंजिनिअर होता. त्याची प्रकृती खराब झाली व किडनी खराब होवून त्यांचा मृत्यू झाला. त्याचा जीव वाचविण्यासाठी आईने किडनी दिली. परंतु, उपयोग झाला नाही. अशा स्थितीतही मोहता यांचे स्वच्छतेचे काम सुरू आहे. आता त्यांची ही स्वच्छतेची तळमळ बघून सून व परिसरातील महिला त्यांना मदत करीत आहे. त्यांचे स्वच्छता कार्य सर्वासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
न्यू इंग्लिश हायस्कूल जवळील नाल्यावर पुल बांधणे, कचऱ्याला ढोला बंद करणे, सांस्कृतिक भवनाचे अपूर्ण अवस्थेतील बांधकाम पूर्ण करून त्याठिकाणी शाळा, डॉक्टर हब किंवा व्यावसायिक वापर करणे याबाबत मुख्य अधिकारी नगर परिषद वर्धा यांना सतीश देशमुख यांनी निवेदन दिले. परंतु, नगर परिषदे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ही परिस्थती निर्माण झाली आहे.