३५ वर्षानंतर मोई गावाला मिळणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:23 PM2018-02-02T23:23:15+5:302018-02-02T23:23:46+5:30
डोंगर माथ्यावरील रेड झोन मध्ये असलेल्या मोई गावाला पाणीपुरवठ्यासाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. शेवटी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ७५ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार दादाराव केचे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : डोंगर माथ्यावरील रेड झोन मध्ये असलेल्या मोई गावाला पाणीपुरवठ्यासाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. शेवटी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ७५ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार दादाराव केचे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पंचायत समिती सभापती निता होले, जिल्हा परिषद सदस्या छाया घोडिले, अंकिता होले, मोईचे उपसरपंच किसन चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, भाजपा शहर अध्यक्ष अॅड. मनीष ठोंबरे, भाजयुमो आर्वी विधानसभा प्रमुख गजानन भोरे, युवा मोर्चा महामंत्री राहुल बुले, नगरसेवक अजय लेकुरवाळे, सुरेश काळपांडे, सिराज अहमद, दिनेशसिंग चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मोई पाणीपुरवठ्याबाबत माहिती देताना दादाराव केचे यांनी सांगितले की, दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण व्हायची, गावकºयांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी प्रत्यक्ष गावकºयांना विश्वासात घेवून आश्वासन दिले होते. योजना कार्यान्वित होण्यासाठी आमदार असताना शासनदरबारी सातत्याने प्रयत्न केले. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार असल्यामुळे मंजुरीसाठी अडचण येत होती. आता आमदार नसताना देखील भाजपाचे सरकार असल्याने वारंवार मुंबईला जाऊन मागणी लावून धरली.
१४ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला प्रशासकीय मान्यता प्रदान करावी यासाठी प्रस्ताव सादर झाला. पाणीपुरवठा विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे प्रस्ताव प्रलंबित असताना १५ जानेवारी २०१८ रोजी सदर प्रस्तावास मान्यता प्रदान करण्याचे आदेश मिळाले. २९ जानेवारी २०१८ ला ७५ लाख रुपये मंजूर झाले व शासन निर्णय निघाला.
मोई वासियांच्या प्रलंबित मागणीला आपण ३५ वर्षाच्या संघर्षाचे साक्षीदार ठरलो आणि कायमस्वरुपी प्रश्न निकाली निघाला असे त्यांनी सांगितले. योजना कार्यान्वित झाल्याबरोबर सुसुंद्रा तलावावरुन फिल्टर प्लॅन्टसहीत योजनेचा गावकºयांना लाभ होईल, असे दादाराव केचे यांनी सांगितले. यावेळी मोई गावातील सर्व ग्रा. प. सदस्य व नागरिकांनी केचे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.