मध्यरात्री भेटायला आलेल्या मुलीचा विनयभंग, आरोपीस तीन वर्षांचा कारावास; फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी
By चैतन्य जोशी | Published: October 7, 2023 07:28 PM2023-10-07T19:28:09+5:302023-10-07T19:32:40+5:30
यातील आरोपी हा पीडितेच्या घरामागेच राहतो. तो पीडितेच्या घरी शेतात कामासाठी जात असल्याने पीडितेची ओळख होती.
वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी तुषार लंकेश पेढे (रा. मार्डा) याला तीन वर्षे सश्रम कारावास आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष एन. करमरकर यांनी ठोठावली.
यातील आरोपी हा पीडितेच्या घरामागेच राहतो. तो पीडितेच्या घरी शेतात कामासाठी जात असल्याने पीडितेची ओळख होती. त्यामुळे कधी कधी ती फोनवरही त्याच्यासोबत बोलत होती. १७ जुलै २०२० रोजी आरोपीने पीडितेच्या वडिलांच्या फोनवर मेसेज करून १८ जुलै रोजी रात्री बारा वाजता गावातील शाळेत भेटण्यासाठी बोलाविले होते; पण पीडिता ही आरोपीला भेटण्यास गेली नव्हती. त्यामुळे आरोपीने पीडितेला तू मला भेटण्यास आली नाही तर तुझे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
पीडिता घाबरून १९ जुलै २०२० रोजी मध्यरात्री तीन वाजता आरोपीला भेटण्यासाठी गेली असता आरोपीने तिच्याशी असभ्य वर्तन करून तेथून निघून गेला. घडलेली घटना पीडितेने तिच्या आई- वडिलांना सांगितली. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रिती आडे यांनी करून आरोपीविरुद्ध पुरावा उपलब्ध करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता प्रसाद पी. सोईतकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना सहा. फौजदार आनंद कोटजावरे यांनी साक्षीदारांना हजर करून मोलाची कामगिरी बजावली. शासनातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.