अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, ३ वर्षांसाठी तुरुंगात गेला
By चैतन्य जोशी | Published: October 31, 2023 07:25 PM2023-10-31T19:25:21+5:302023-10-31T19:28:16+5:30
हा निर्णय प्रथमवर्ग न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दिला.
वर्धा: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणे चांगलेच भोवले असून न्यायालयाने आरोपी संतोष कवडूजी मुंगले (२९ रा. पवनार) याला तीन वर्षाचा कारावास आणि ३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. हा निर्णय प्रथमवर्ग न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दिला.
प्राप्त माहितीनुसार, ४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्या दरम्यान पीडितेच्या घरी गणपतीच्या जेवणाचा कार्यक्रम होता. त्यामुळे पीडिता तिच्या आते बहिणीसोबत कोहळं आणण्यासाठी जात असताना आरोपी संतोष मुंगले हा पीडितेच्या समोर आला आणि तिला म्हणाला तू काल माझ्या काकूची तक्रार दिली, असे म्हणत विनयभंग केला. पीडितेने झटका देऊन त्याचा हात सोडवला. तेव्हा पीडितेच्या आतेबहिणीने ही बाब तिच्या आईला आवाज देऊन बोलाविले तेव्हा पीडितेची आई व तिच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलेलाही त्याने शिवीगाळ केली.
त्यानंतर लगेच त्यांनी पोलिसात तक्रार दिली. सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा नोंद करून प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रीती किसन आडे यांनी केला. आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार तर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. विनय आर. घुडे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. स्वाती एन. गेडे (दोडके) यांनी मदत केली. पैरवी सहा. फौजदार दिंगाबर गांजरे, जयेश दांडके यांनी साक्षीदारांना हजर करुन मोलाची कामगिरी बजावली. शासना तर्फे ६ साक्षीदार तपासले. यशस्वी युक्तिवाद ग्राह्यधरुन अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस तीन वर्षाचा कारावास ठोठावला.