पैशाच्या वादातून महिलेची हत्या
By admin | Published: August 30, 2016 02:20 AM2016-08-30T02:20:08+5:302016-08-30T02:20:08+5:30
घर बांधकामाकरिता घेतलेल्या पैशातून झालेल्या वादात महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही
वर्धा : घर बांधकामाकरिता घेतलेल्या पैशातून झालेल्या वादात महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. संगीता अनिल परसराम (३५) रा. गजानन नगर असे मृतक महिलेचे नाव आहे. तर कवीश उर्फ कवडू क्षीरसागर रा. गजानन नगर असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे.
या प्रकरणी मृतकांच्या नातलगांनी संगीताचा मृतदेह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेला. यावेळी तक्रार घेण्यास नकार देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सदर प्रकरणात पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला असता तर ही घटना घडली नसती, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
कवीशने केवळ चाकूने हल्ला करीत संगीताची हत्या केली नाही. त्याने प्रथम तिच्या गळ्यावर चाकूचा वार केला. यात तिचा मृत्यू झाला नसल्याने तिला घराच्या बैठक खोलीत ओढत आणत पुन्हा तिच्या पोटावर चाकूने वार केला. यातही ती ठार झाली नसल्याने घराबाहेर ओढत आणत तिचे डोके दगडाने ठेचून ठार केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलीस सूत्रानुसार, संगीताचा पती अनिल परसराम याने कवीश याच्याकडून घर बांधकामाकरिता कर्ज घेतले होते. या कर्जाच्या पैशाकरिता कवीश व संगीता यांच्यात नेहमीच वाद होत होता. हा वाद सुरू असताना सोमवारी कवीश हा बळजबरीने संगीताच्या घरात शिरला. यात त्याने थेट तिच्यावर हल्ला चढविला. तिच्या बचावाकरिता यावेळी तिच्या घरी असलेली तिची बहीण ममता रमेश धामणकर ही मधे पडली असता तिच्यावरही त्याने वार केला यात तिही जखमी झाली. घटनेची माहिती रामनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस पोहोचेपर्यंत आरोपी शस्त्रासह पसार झाला होता. त्याचा शोध सुरू असल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक केळे यांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी करीत पंचनामा केला. संगिताचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी ममता धामणकर हिच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या ४५२, ३०२, ३२६, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
मृतदेह एसपी कार्यालयात
४कवीश कडून होत असलेल्या त्रासाची तक्रार देण्याकरिता संगीता व तिचा परिवारातील सदस्य गेले असता रामनगर पोलिसांकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करीत संगीताचा मृतदेह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणातील आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी चौकशीअंती दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या लेखी आश्वासनाववर मृतदेह परत नेण्यात आला.
तीन दिवसांपूर्वी संगीताचा आत्महत्येचा प्रयत्न
४कवीश कडून होत असलेल्या त्रासामुळे संगीता हिने तीन दिवसापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने विष घेतल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबियांनी तिला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. येथे उपचाराअंती तिला रविवारी सुटी देण्यात आली होती, अशी माहिती मृतकाची बहीण ममता धामणकर यांनी दिली.