स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मुद्रा ऋण योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:05 AM2018-03-24T01:05:51+5:302018-03-24T01:05:51+5:30
स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या होतकरू युवकांना प्रोत्साहन देण्याचे दृष्टीने पंतप्रधान मुद्रालोन योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्याचा तरुण-तरुणींनी लाभ घेतला पाहिजे, .....
ऑनलाईन लोकमत
समुद्रपूर : स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या होतकरू युवकांना प्रोत्साहन देण्याचे दृष्टीने पंतप्रधान मुद्रालोन योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्याचा तरुण-तरुणींनी लाभ घेतला पाहिजे, असे प्रतिपादन स्थानिक विद्या विकास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश बोभाटे यांनी केले.
जिल्हा समन्वय समिती मुद्रा योजना वर्धा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था समुद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मुद्रालोन योजना प्रचार व प्रचार एकदिवसीय प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर तहसीलदार दीपक करंडे, जिल्हा महिती अधिकारी मनिषा साबळे, सहा. संचालक गोस्वामी, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालय वर्धाचे प्रमुख मार्गदर्शक सम्राट वर्मा, बँक आॅफ इंडिया जामचे शाखा व्यवस्थापक राकेश कदम, डी. डी. कुंभारे, डॉ. निरझर कुलकर्णी, सचिन कापकर, शिवाजी चौधरी, उषा काळे, नायब तहसीलदार सूर्यवंशी, निमजे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी ग्रामीण युवकांनी स्वयंरोजगाराच्या संधीचा शोध घेऊन लहान-मोठे उद्योग उभारून आपले जीवनमान उंचाविले पाहिजे, असे सांगितले. जिल्हा उद्योग केंद्र वर्धाच्या उषा काळे यांनी भावी उद्योजकांचे अंगी कोणते कौशल्य असावे याविषयी माहिती दिली. बँकचे शाखा व्यवस्थापक वर्मा यांनी बँकेचा कसा विश्वास संपादन करण्याचा, कर्ज परतफेड कसे करावे, आपली पत कशी वाढेल याची माहिती उपस्थितांना दिली.
गोस्वामी यांनी मुद्रा लोन हे व्यवसाय करणे, उत्पादन किंवा सेवा देणाºयांना ५० हजारापासून ते १० लाखपर्यंत कर्ज देऊ शकते. यात तीन प्रकार आहे. शिशू, किशोर व तरूण या तीन गटात योजनेचे लाभ घेणाºयांचे वर्गीकरण करण्यात येते. शिशु श्रेणी अंतर्गत ५० हजार रूपये, किशोर श्रेणीत ५ लाखपर्यंत तर तरूण श्रेणीत १० लाखपर्यंत कर्ज दिल्या जाते. आपण कसे योग्य आहोत हे आपल्याला बँकेला पटवून देऊन उद्योजकांनी टप्प्या टप्प्याने आपली प्रगती करावी असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
भारतीय युवा ट्रस्टचे राकेश कदम यांनी यशस्वी उद्योजक कसा असतो. वर्धा जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांनी आपली प्रगती कशी साधली, यावर प्रकाश टाकला. प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, यावर डी. डी. कुंभारे यांनी मार्गदर्शन केले. सदर एकदिवसीय मुद्रालोन प्रशिक्षणात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी आयटीआय, एम.सी.व्ही.सी.च्या विद्यार्र्थ्यांचा सर्वांगिण विकास कसा होईल यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमादरम्यान यशस्वी उद्योजक स्वप्नील निमजे, सौरभ वरघणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य निमजे यांनी केले. संचालन प्रा. अभय दांडेकर यांनी केले. जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी उमेश खारोडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला आय. टी. आय. समुद्रपूर, गिरड, विद्या विकास महाविद्यालयाच्या एम. सी. व्ही. सी. विभागाच्या विद्यार्थी, विकास कनिष्ठ महाविद्यालय समुद्रपूर, कोराचे आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता सर्व कर्मचाºयांनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. तरुणांना मेळाव्याच्या माध्यमातून उद्योग उभारणीबाबत माहिती देण्यात आली.