पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवारच्या कामांचे नियोजन करा
By admin | Published: March 12, 2016 02:23 AM2016-03-12T02:23:00+5:302016-03-12T02:23:00+5:30
जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे गावात शिवारफेरी घेताना ..
अनुप कुमार : महसूलवाढीच्या उपाययोजनांचा घेतला आढावा
वर्धा : जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे गावात शिवारफेरी घेताना गावातील सरपंच महसूल अधिकारी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत जलयुक्त शिवार अभियानाचे महत्त्व समजावून सांगा, तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी सुरू होतील, या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी येथील जिल्हा यंत्रणेला दिल्या.
विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध महसूल वसुलीसंदर्भात दिलेल्या उद्दीेष्टांचा तसेच जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा विभागनिहाय आढावा घेतला.
जिल्ह्यासाठी महसूल गोळा करण्यासाठी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासंदर्भात महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेताना अनूप कुमार यांनी जिल्ह्याला दिलेल्या उद्दीष्टांपैकी गोळा झालेल्या महसूला संदर्भात समाधान व्यक्त केले.
अद्यापपर्यंत उद्दीष्ट पूर्ण न केलेल्या तालुक्यांनी विशेष मोहीम राबवावी, अशी सूचनाही केली. मागेल त्याला शेततळे ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी तालुकानिहाय नियोजन करावे व दिलेले उद्दीष्ट पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यानुसार काम करण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
जि.प.च्या योजनांचाही घेतला आढावा
वर्धा : विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्यावर झालेल्या उद्दिष्टांसंदर्भात विभागप्रमुखांकडून माहिती घेतली. कारंजा व आष्टी संपूर्ण तालुका निर्मल करण्याच्या दृष्टीने नियोजन करा, तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना विभागप्रमुखांना दिल्यात.
जिल्हा परिषदेतील प्रत्येक विषयाचा सखोल आढावा घेताना विभागांना दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करताना जलयुक्त शिवार योजना तसेच मागेल त्याला शेततळे या योजनेचा प्रसार, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी विभागीय आयुक्त यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. तसेच विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यासंदर्भात माहिती दिली. मागेल त्याला शेततळे ही योजना लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शनिवार, रविवारी प्रत्येक ंताालुक्यात विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असून जिल्ह्याला असलेले २ हजार २४ शेततळ्यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)