...अन् 'ती' ईव्हीएम मशीन मतदान केंद्रातच राहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 11:36 AM2019-03-25T11:36:38+5:302019-03-25T11:41:07+5:30
मोरांगणा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला. मतदानानंतर चार वॉर्डपैकी एका वॉर्डची ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात टाकून मतदान अधिकारी व कर्मचारी निघून गेले आहेत.
वर्धा - मोरांगणा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला. मतदानानंतर चार वॉर्डपैकी एका वॉर्डची ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात टाकून मतदान अधिकारी व कर्मचारी निघून गेले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत घडलेला हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर फोनाफोनी झाली. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता एका वाहनात आलेला एक कर्मचारी ईव्हीएम मशीन घेऊन गेला आहे.
ग्रामपंचायतीच्या चार वॉर्डसाठी रविवारी (24 मार्च) मतदान घेण्यात आले. मतदान शांततेत पार पडावे म्हणून चार वर्ग खोल्यांमध्ये चार वॉर्डच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या. सायंकाळी मतदान पार पडल्यानंतर मतदान प्रतिनिधींच्या उपस्थित ईव्हीएम मशीन सिल करण्यात आल्या. काही वेळाने ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी आलेल्या वाहनात बसून अधिकारी व कर्मचारी रवाना झाले. मात्र घाईगडबडीत वॉर्ड क्रमांक एकची मशीन घेऊन जायला अधिकारी आणि कर्मचारी विसरले.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावातील काही मंडळींनी काही राहून तर गेले नाही ना म्हणून वर्गात पाहिले असता त्यांना वॉर्ड क्र. 1 च्या खोलीत ईव्हीएम मशीन आढळून आली. काही ग्रामस्थांनी तातडीने याबाबत आमदार अमर काळे यांना माहिती दिली. काळे यांनी तहसीलदारांना फोनवरून मशीन विसरून गेल्याचे सांगितलं. त्यानंतर रात्री 8.30 वाजता एका वाहनातून एक कर्मचारी आला व ईव्हीएम मशीन घेऊन गेला. तहसीलदार पवार यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, झोनल मॅनेजर नंतर येणार होते व टीमला सोबत नेणार होते. पण नेमकी एकच ईव्हीएम मशीन का ठेवली असा प्रश्न विचारले असता ते काहीच बोलू शकले नाहीत.