मूलभूत सुविधांसाठी काकडदराच्या ग्रामस्थांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:34 PM2018-02-28T23:34:25+5:302018-02-28T23:34:25+5:30
काकडदरा येथील ग्रामस्थांच्या समस्या सोडवा, त्यांना मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी करीत युवा स्वाभिमान पार्टीने एसडीओ कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा यांना निवेदन दिले.
ऑनलाईन लोकमत
आर्वी : काकडदरा येथील ग्रामस्थांच्या समस्या सोडवा, त्यांना मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी करीत युवा स्वाभिमान पार्टीने एसडीओ कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा यांना निवेदन दिले. मागण्या पूर्ण न झाल्यास खटीया खडी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
बुधवारी युवा स्वाभिमान पार्टी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात ग्रा.पं. सदस्य पांडुरंग सोरांबे, माजी सरपंच देविदास सयाम यांच्यासह काकडदरा येथील ग्रामस्थांनी एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय अधिकारी शर्मा यांना निवेदन देत चर्चा कररण्यत आली. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही काकडदरा गावात बससेवा उपलब्ध नाही. गौरखडा मार्गे रोहणा रस्ता झाल्यास ५ ते ६ किमी अंतरात काकडदरा गावात पोहोचणे शक्य आहे; पण रस्ता नसल्याने १८ ते २० किमी फिरून यावे लागते. रुग्ण असो वा प्रसूतिची महिला यांना अडचणींचा सामना करावा लागतो. काकडदरा गाव १०० टक्के आदिवासीबहुल असून गावाचा त्वरित बीपीएल सर्व्हे करावा. गरजूंना बीपीएल यादीत समाविष्ट करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या. काकडदरा गावात अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून ती पडण्याच्या स्थितीत आहे. अप्रिय घटना घडू नये म्हणून त्वरित इमारतीचे बांधकाम करावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. पाणी फाऊंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम व ग्रामस्थांच्या परिश्रमाने काकडदरा गाव जलमय झाले खरे; पण पाईपलाईन फुटल्याने ग्रामस्थांना एक ते दीड किमी जंगलातून पाणी आणावे लागते. यात श्वापदांची भिती असते. यामुळे त्वरित पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोटफोडे, सुरेंद्र वाटकर, नितीन मनवर, राजू राठोड, कमलेश चिंधेकर, राहुल विरेकर, सिद्धांत कळंबे, भारत पवार, बादल काळे यासह काकडदरा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.