‘मातीचा चेंडू’होण्यापूर्वीच ४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी केली पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 08:00 AM2022-06-21T08:00:00+5:302022-06-21T08:00:06+5:30

Wardha News ‘मातीचा चेंडू’ होत आहे काय याची शहानिशा करण्यापूर्वीच यंदा मोसमी पाऊस आला असे समजून सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील ४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची पेरणी केली आहे.

More than 4,000 farmers did sowing before the 'soil ball' | ‘मातीचा चेंडू’होण्यापूर्वीच ४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी केली पेरणी

‘मातीचा चेंडू’होण्यापूर्वीच ४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी केली पेरणी

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३७९.२८ मिमी पावसाची नोंद

वर्धा : ‘मातीचा चेंडू’ होत आहे काय याची शहानिशा करण्यापूर्वीच यंदा मोसमी पाऊस आला असे समजून सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील ४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची पेरणी केली आहे. जिल्ह्यातील काही भागात पीकही अंकुरले असून अंकुरलेले पीक जगविण्यासाठी शेतकरी सध्या जीवाचा आटापिटा करीत आहेत.

मागील वर्षी २० जूनपर्यंत जिल्ह्यात १ हजार ३८८.०४ मिमी पाऊस झाला होता. तर यंदाच्या वर्षी २० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३७९.२८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील आठ पैकी एकाही तालुक्यात अद्यापही १०० मिमी पावसाची नोंद घेण्यात आली नाही; पण मोसमी पावसाचे आगमन झाले असा अंदाज बांधत जिल्ह्यात ३८६ हेक्टरवर तूर, ६३४ हेक्टरवर सोयाबीन तर तब्बल ३ हजार १५४ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागात बियाणे अंकुरले असून ते जगविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास पेरणीची लगीनघाई करणाऱ्या या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटच ओढावणार आहे. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी दमदार पावसाअभावी पेरणी न केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

काय आहे 'मातीचा चेंडू'

पेरणी करायची असेल तर किमान १०० मिमी पाऊस झाला पाहिजे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगितले जाते; पण आपल्या शेतात पेरणीयोग्य पाऊस झाला काय याची शहानिशा शेतकरी अगदी साध्या पद्धतीने करू शकतात. त्याला 'मातीचा चेंडू झेला' फॉर्म्युला म्हणतात. गाव परिसरात पावसाच्या सरी झाल्यावर पेरणीसाठी जमीन तयार आहे काय याची शहानिशा करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील माती उचलून त्याचा लाडूप्रमाणे गोळा (चेंडू) करावा. शिवाय हा मातीचा चेंडू फेकावा आणि झेलावा. झेललेला मातीचा चेंडू कायम राहिला तर शेतजमीन पेरणी योग्य आहे असे समजावे.

आता कृषी अधिकारी बांधावर पोहोचून करणार मार्गदर्शन

* पेरणीयोग्य शेतजमीन आहे काय याची शहानिशा न करता जिल्ह्यातील चार हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी पेरणी केल्याचे आणि अंकुरलेले पीक जगविण्यासाठी शेतकरी तारेवरची कसरत करीत असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत योग्य सल्ला देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

* सलग आठ दिवस राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेदरम्यान खुद्द जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि १७६ कृषी सहायक, ५० कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी, आठही तालुका कृषी अधिकारी तसेच तिन्ही उपविभागीय कृषी अधिकारी पेरणीची लगीनघाई करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांना अंकुरलेले पीक कशा पद्धतीने जगवावे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

* शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी विभागाचे अधिकारी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास पीक विमा कसा फायद्याचा ठरतो यासह अल्प जलसाठ्याच्या भरवशावर अंकुरलेले पीक कसे जगवावे, अंकुरलेले पीक कुठल्याही रोगाच्या भक्षस्थानी पडू नये यासाठी शेतकऱ्यांनी काय दक्षता घ्यावी आदी विषयी अगदी सोप्या शब्दात मार्गदर्शन करणार आहे.

* कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आठ दिवसीय विशेष मोहिमेदरम्यान कृषी विभागाचा प्रत्येक अधिकारी प्रत्येक दिवशी किमान दहा गावांना भेटी देत १०० मिमी पाऊस पडण्यापूर्वीच पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे जो कृषी अधिकारी या कामात हयगय करेल त्याच्यावर नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

पेरणी योग्य पाऊस होण्यापूर्वीच सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील चार हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस व तुरीची लागवड केल्याचे वास्तव आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना योग्यवेळी योग्य सल्ला मिळावा म्हणून कृषी विभाग बुधवारपासून विशेष मोहीम राबविणार आहे. या मोहिमेदरम्यान पेरणीची लगीनघाई केलेल्या शेतकऱ्यांना अंकुरलेले पीक कसे वाचवावे याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीत कुणी हयगय केल्यास त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी अंकुरलेल्या पिकाला डवरणी करीत संभाव्य बाष्पीभवनाला ब्रेक लावण्यासाठी पिकाला काडी कचऱ्याचे मल्चिंग करावे.

- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

Web Title: More than 4,000 farmers did sowing before the 'soil ball'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती