पूर्वी अतिवृष्टीने मोडले कंबरडे; आता भाववाढीकडे नजरा, अडीच लाखांहून अधिक कापूस घरीच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 03:58 PM2023-03-28T15:58:44+5:302023-03-28T16:00:05+5:30

१० लाख क्विंटल कापूस उत्पादनाचा कृषी विभागाचा अंदाज

More than two and a half lakh cotton in farmers' homes, Agriculture department estimate of 10 lakh quintal cotton production | पूर्वी अतिवृष्टीने मोडले कंबरडे; आता भाववाढीकडे नजरा, अडीच लाखांहून अधिक कापूस घरीच

पूर्वी अतिवृष्टीने मोडले कंबरडे; आता भाववाढीकडे नजरा, अडीच लाखांहून अधिक कापूस घरीच

googlenewsNext

महेश सायखेडे

वर्धा : कापूस उत्पादकांचा हब अशी वर्धा जिल्ह्याची ओळख. यंदाच्या वर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील सात बाजार समित्यांतर्गत ८.२२ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. असे असले तरी अजूनही भाववाढीच्या आशेने वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस साठवून आहे. शेतकऱ्यांच्या घरी असलेला हा कापूस सुमारे अडीच लाख क्विंटलच्या घरात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात २.१५ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. त्यानंतर अंकुरलेले पीक बघून यंदा नक्कीच समाधानकारक उत्पन्न होईल असा कयास शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात होता. अशातच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी झाली. त्यामुळे कपाशी पिकाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याने यंदा हेक्टरी पाच क्विंटल उत्पादनाचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा वर्धा जिल्ह्यातील कापूस उत्पादनाचा विचार केल्यास जिल्ह्यात सुमारे १० लाख ७५ हजार क्विंटल कापसाचे उत्पादन झाले आहे. त्यापैकी ८ लाख २२ हजार क्विंटल कापूस शेतकऱ्यांची बाजार समितींच्या अधिकृत व्यापाऱ्यांना विकला असल्याचे वास्तव असून, सद्य:स्थितीत अडीच लाख क्विंटल कापूस वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरीच असल्याचे बोलले जात आहे. एकूणच पूर्वी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, तर आता भाववाढीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

कापूस खरेदीत हिंगणघाट अव्वल

यंदाच्या वर्षी जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी अद्यापही सुरू झाली नसली तरी आतापर्यंत बाजार समितीच्या नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी ५ मार्च २०२३ पर्यंत तब्बल ८.२२ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. कापूस खरेदीत हिंगणघाट बाजार समिती अव्वल असून, तेथे ३३२५६३.०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

बाजार समितीनिहाय यंदाची कापूस खरेदीची स्थिती

  • वर्धा : ७१,१६९.१५ क्विंटल
  • पुलगाव : १,४५,९३७.८० क्विंटल
  • आर्वी : ९७७७६.७० क्विंटल
  • आष्टी : १४,८९३.०० क्विंटल
  • सिंदी : ८०,०१२.०० क्विंटल
  • समुद्रपूर : ८०,०१२.०० क्विंटल
  • हिंगणघाट : ३,३२,५६३.०० क्विंटल

 

गतवर्षी बाजार समित्यांनी खरेदी केला २०.४६ लाख क्विंटल कापूस

कोविड संकटकाळात कृषी क्षेत्राने जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला सुस्थितीत ठेवले. मागील वर्षी म्हणजेच २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील सात बाजार समित्यांच्या नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी एकूण २० लाख ४६ हजार १४३.७७ क्विंटल कापसाची खरेदी केली होती. त्याबाबतची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. तर यंदा ५ मार्चपर्यंत ८ लाख २२ हजार ३६३.६५ क्विंटल कापूस खरेदी बाजार समितीच्या अधिकृत व्यापाऱ्यांनी केली आहे.

वर्षनिहाय बाजार समित्यांची कापूस खरेदीची स्थिती

  • २०१७-१८ : १,६६,७०,८४.३३ क्विंटल
  • २०१८-१९ : २६,६३,४७६.८० क्विंटल
  • २०१९-२० : २४,१३,११५.७९ क्विंटल
  • २०२०-२१ : २९,३४,५१८.८१ क्विंटल
  • २०२१-२२ : २०,४६,१४३.७७ क्विंटल
  • २०२२-२३ : ८,२२,३६३.६५ क्विंटल

 

खरीप हंगामात जिल्ह्यात सव्वादाेन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. पण, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यांत वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या कपाशी पिकाचे ५० टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याने उत्पादनातही घट झाली. यंदा जिल्ह्यात सरासरी हेक्टरी पाच क्विंटल कापसाचे उत्पादन झाले आहे.

- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा

Web Title: More than two and a half lakh cotton in farmers' homes, Agriculture department estimate of 10 lakh quintal cotton production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.