गुलाबी थंडीत वाढली मॉर्निंग वॉकची क्रेझ
By admin | Published: December 27, 2014 10:57 PM2014-12-27T22:57:56+5:302014-12-27T22:57:56+5:30
धावपळीच्या जीवनात आरोग्य तंदुरुस्त राहावे, यासाठी पहाटे उठून रस्त्यावरुन जलदगतीने चालणे, यासारखा दुसरा व्यायाम नाही. यामुळे रक्ताभिसरण उत्तम प्रकारे होऊन काम करण्यासाठी दिवसभर
वर्धा : धावपळीच्या जीवनात आरोग्य तंदुरुस्त राहावे, यासाठी पहाटे उठून रस्त्यावरुन जलदगतीने चालणे, यासारखा दुसरा व्यायाम नाही. यामुळे रक्ताभिसरण उत्तम प्रकारे होऊन काम करण्यासाठी दिवसभर पुरेसी ऊर्जा मिळते. थकवा जाऊन काम करण्याचा उत्साह वाढतो. वाढता तणाव कमी करण्यासाठी व विविध आजारावर रामबाण उपाय ठरणाऱ्या ‘मॉर्निंग वॉक’साठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गर्दी रस्त्यावर वाढलेली आहे. शहरातील पिपरी (मेघे) भागात असलेल्या टेकडी परिसरात तसेच जिल्हा स्टेडिअमवर दररोज गर्दी पहावयास मिळते.
हिवाळा सुरू होताच गुलाबी थंडीत फिरण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. त्यातही स्वत:च्या प्रकृतीविषयी जे जागरुक आहेत, ते नागरिक पहाटे फिरण्याचा दिनक्रम तयार करतात. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच काही ना काही व्याधी जडलेल्या असतात.
कामचा ताण तसेच वेळेचा अभाव यामुळे शुगर, रक्तदाब यांसारख्या तक्रारी कॉमन झाल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी दवाखान्याचे खेटे घातल्याने रुग्णाच्या खिशाला झळ पोहचते. त्यापायी होणारे आर्थिक नुकसान टाळले जावे तसेच धकाधकीच्या जीवनातून चार क्षण स्वत:साठी जगता यावे म्हणून नागरिक मॉर्निंग वॉकला पसंती देत तशी सवयच पाडून घेत आहे. महिलांनाही आरोग्याच्या अनेक समस्या सतावत असल्याने त्याही पसंती देत आहे.