शहरातील बहुतांश एटीएम अद्याप ‘कॅशलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:24 PM2019-02-11T22:24:52+5:302019-02-11T22:25:13+5:30

नोटाबंदीनंतर फार मोठा कालावधी लोटूनदेखील शहरातील बहुतांश एटीएम ‘कॅशलेस’च असल्याने शोभेचे ठरत आहेत. यात व्यवहारात अडचणी निर्माण होत असल्याने ग्राहक रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

Most ATMs in the city are still cashless | शहरातील बहुतांश एटीएम अद्याप ‘कॅशलेस’

शहरातील बहुतांश एटीएम अद्याप ‘कॅशलेस’

Next
ठळक मुद्देव्यवहारात अडचणी : ग्राहकांच्या नशिबी भटकंतीच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नोटाबंदीनंतर फार मोठा कालावधी लोटूनदेखील शहरातील बहुतांश एटीएम ‘कॅशलेस’च असल्याने शोभेचे ठरत आहेत. यात व्यवहारात अडचणी निर्माण होत असल्याने ग्राहक रोष व्यक्त करताना दिसत आहेत.
शहरात राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांचे ७५ च्या जवळपास एटीएम केंद्र आहे. मात्र, बहुतांश एटीएम केंद्रांना अद्यापही ‘नो कॅश’चे ग्रहण लागलेले दिसून येते. परिणामी, ग्राहकांची या एटीएमवरून त्या एटीएमवर अशी भटकंती पहायला मिळते. यात पेट्रोलची नासाडी होतेच, मनस्तापही सहन करावा लागतो. कुठल्याही एटीएम केंद्रात गेले तरी खडखडाटच दिसून येत असल्याने ग्राहक संबंधित बँक व्यवस्थापन, एजन्सीविषयी संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. एखाद्या एटीएम केंद्रात पैसे उपलब्ध असतील तर ग्राहकाला हवे असलेले चलन-शंभर, दोनशेच्या नोटा मिळत नाही. शहरात बँक आॅफ इंडियाचे सहा ते सात एटीएम केंद्र आहेत. मात्र बहुतांशवेळी यातील एकच एटीएम सुरू असते. याशिवाय अन्य केंद्रांवरही नो कॅशचे फलक सदैव झळकताना दिसतात. यामुळे मागील काही दिवसांपासून सर्वच बँकांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. असे असताना काही बँकांत अतिरिक्त खिडकीदेखील सुरू केली जात नाही. यामुळे तासन्तास बँकेतच ताटकळत राहावे लागत असल्याने पेन्शनची रक्कम घेण्याकरिता आलेल्या वयोवृद्धांना मनस्ताप सहन करावा लागतो. याशिवाय बँकेतील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना कधीही सौजन्याची वागणूक दिली जात नाही. बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत ग्राहकांना या बाबीचा वेळोवेळी प्रत्यय येतो. शाब्दिक वाद येथे नेहमी पाहायला मिळतो. याविषयी अनेकदा शाखा व्यवस्थापक, विभागीय कार्यालयाकडे तक्रारी केल्या जातात, मात्र त्यांच्याकडूनही या प्रकारावर पांघरूण घालण्याचाच प्रयत्न केला जातो. एटीएमची मोठी संख्या असतानादेखील बोटावर मोजण्याइतपतच सुरू राहत असल्याने शोभेचे ठरताना दिसत आहेत. नोटाबंदीनंतर फार मोठा काळ लोटूनही आर्थिक घडी विस्कटलेलीच दिसून येत आहे. यात सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे लावे लागत आहे.
वातानुकूलित यंत्रणाही बंदच
अनेक एटीएममधील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने शोभेचीच ठरत असतानाच काही एटीएममध्ये ही यंत्रणाच अस्तित्वात नाही. त्यामुळे सर्व्हर डाऊन होणे व अन्य तांत्रिक बिघाड निर्माण होणे, या बाबी नित्याच्याच झाल्या आहेत. यामुळे ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
केंद्रांची सुरक्षाही वाऱ्यावर
शहरात एटीएम केंद्रांची संख्या मोठी असून सुविधांचा अभाव कायम आहे. निम्म्यापेक्षा अधिक केंद्रात सुरक्षारक्षक नसल्याने एटीएमची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. शिवाय केंद्राची दारेही पूर्णत: बंद होत नसल्याने रात्री आणि दिवसा अनेक केंद्रांमध्ये मोकाट कुत्री, शेळ्या बसलेल्या आढळून येतात. मात्र, कुठल्याही उपाययोजना बँक व्यवस्थापनांकडून केल्या जात नाहीत. प्रत्येक केंद्रावर सुरक्षारक्षक नियुक्तीची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Most ATMs in the city are still cashless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.