बहुतांश पक्षी निसर्गशेतीला उपकारकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:15 PM2018-02-01T23:15:51+5:302018-02-01T23:16:03+5:30
ऑनलाईन लोकमत
वर्धा : निसर्गशेतीमध्ये पिकांच्या संरक्षणात पक्ष्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी धुरे नष्ट न करता शेतबांधावर झाडे लावावित. जेणे करून पक्ष्यांचे थांबे वाढतील आणि इतर उपयुक्त प्राण्यांचाही वावर वाढेल. या जीवांमुळे पिकांना फारशी हानी न होता शेतीसाठी अपायकारक ठरणाऱ्या किटकांचा ऱ्हास ते करतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारूती चितमपल्ली यांनी केले. बहार नेचर फाऊंडेशनद्वारे रोठा येथे आयोजित शेतकरी पक्षीमित्र मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
रोठा येथील अॅग्रो थिएटरच्या परिसरात शेतकऱ्यांकरिता मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे उद्घाटन मारूती चितमपल्ली यांच्या हस्ते रोपट्याला पाणी देऊन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपवनसंरक्षक दिगंबर पगार होते. मंचावर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई येथील संशोधक व पक्षीतज्ज्ञ डॉ. राजू कसंबे, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात मारूती चितमपल्ली यांनी निसर्गशेतीमधील पक्ष्यांचे स्थान अधोरेखित करतानाच नवेगावबांध येथील वास्तव्यात माधवराव पाटील यांनी केलेल्या बेडूक संवर्धन प्रयोगाचीही माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात दिगंबर पगार यांनी काळानुसार पिकांमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला.
मेळाव्यात डॉ. राजू कसंबे यांनी ‘शेतातील पक्षी’ या विषयाची एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विस्तृत माहिती दिली. अनेक पक्षी बिजाहारी असले तरी ते शेतातील अभ्या पिकांवरचे धान्य खात नसून काढणीनंतर पडणारे दाणेच टिपतात. काही पक्षी हे पिकाला लागणाऱ्या अळीचे आणि कीटकांचे भक्षण करतात. त्यामुळे सरसकट सर्वच पक्ष्यांना नुकसानकारक शत्रू न मानता कीटकांवर नियंत्रण ठेवणारे आपले मित्र पक्षी कोणते हे ओळखण्याची गरज त्यांनी विषद केली.
द्वितीय सत्रात अमरावती येथील डॉ. जयंत वडतकर म्हणाले, परंपगरागत अधिवास व जुने वृक्ष नष्ट्र केल्याने तेथील अनेक सजीवांचे जीवन संपुष्टात येते. मानवीय विकासाच्या या अतिलालसेला पक्षीही बळी पडत असून हा देखील मानव व वन्यजीव संघर्षच होय. तृतीय सत्रात पिपरी बजाज कृषी महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र खर्चे यांनी मित्रकिटकांविषयी माहिती दिली. चौथ्या सत्रात डॉ. गोपाल पालीवाल यांनी मधमाशांचे शेतकी जीवनातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रारंभी मेळाव्याच्या आयोजनाबाबत बहारचे सचिव दिलीप विरखडे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन स्नेहल कुबडे यांनी केले. वक्त्यांचा परिचय प्रा. किशोर वानखडे, संजय इंगळे तिगावकर, डॉ. बाबाजी घेवडे, जयंत सबाने, वैभव देशमुख, राहुल तेलरांधे, यांनी दिला. आभार दीपक गुढेकर यांनी मानले.
मेळाव्यानंतर परिसरातील पक्ष्यांची ओळख करून घेण्यासाठी शिवार फेरी काढण्यात आली. यावेळी शेतातील लहान वृक्षावर मधमाशांच्या घरट्याचे रोपणही करण्यात आले. परिसरात आढळणाºया विविध पक्ष्यांची माहिती देणारी छायाचित्रेही मेळाव्याच्या प्रांगणात लावण्यात आली होती. मेळाव्याला प्रा. भास्कर इथापे, मुरलीधर बेलखोडे, निरंजना व अशोक बंग, आरती व पंकज घुसे यांच्यासह अकोला, अमरावती, यवतमाळ येथील पक्षीमित्र, शेतकरी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या आयोजनात अॅग्रो थिएटरचे हरिश इथापे, बहार नेचर फाऊंडेशनचे रवींद्र पाटील, पराग दांडगे, दर्शन दुधाने, अविनाश भोळे, सुभाष मुडे, राहुल वकारे, हेमंत धानोरकर, तारका वानखडे, डॉ. सुप्रिया गोमासे, पार्थ वीरखेडे, नम्रता सबाने आदींचे सहकार्य लाभले.