हाकेच्या अंतरावर आई; पण भेट नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:58 PM2018-05-28T22:58:55+5:302018-05-28T22:59:11+5:30
बिबट्याच्या बछड्यावर करूणाश्रमात उपचार केल्यानंतर ठणठणीत बरा झाल्याने त्याची मातेसोबत भेट घडवून आणण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. बछड्याला घेवून वनाधिकारी व कर्मचारी मूळ ठिकाणी बसले; पण बिबट मादी इकडे फिरकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली: बिबट्याच्या बछड्यावर करूणाश्रमात उपचार केल्यानंतर ठणठणीत बरा झाल्याने त्याची मातेसोबत भेट घडवून आणण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. बछड्याला घेवून वनाधिकारी व कर्मचारी मूळ ठिकाणी बसले; पण बिबट मादी इकडे फिरकली नाही. ती बाजूच्या शेतात इतर बछड्यांसोबत अनेकांना दिसली. हाकेच्या अंतरावर असूनही या बछड्याची त्याच्या आईसोबतची भेट टळली.
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या झडशी सहवन क्षेत्रातील मदनी शिवारातील शंकर विठोबा दिघडे यांच्या शेतात एक महिन्याचे बिबटाचे पिल्लू आढळून आले होते. त्यांची शारीरिक तपासणी केली असता त्याच्या पायाला जखम होती व ताप होता. त्यामुळे त्याला करूणाश्रमात ठेवण्यात आले होते.
पिल्लू नजरेआड झाल्याने बिबट सैरभैर झाली असून काल तिने अनेकांना दर्शन दिले. रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे, क्षेत्र सहाय्यक के.एस. वाटकर, अरुण मरकाम हे पिल्लाला सोबत घेवून शंकर दिघडे यांच्या शेतात बसले; पण बिबट मादी तिकडे भटकली नाही. त्याचवेळी ती पुष्पा माधव शिंदे यांच्या शेतात पिलासोबत अभिषेक व समाधान नेहारे या भावंडांना दिसली.
आणखी दोन वेळा होणार प्रयत्न
शिंदे व दिघडे यांंचे शेत एकमेकांच्या शेतापासून हाकेच्या अंतरावर आहे. कापून ठेवलेले चारापिक चारचाकी वाहनात भरण्याकरिता अभिषेक व समाधान नेहारे हे शेतात गेले तेव्हा पहाटेचे ४ वाजले होते. बिबट्याचे पिल्लू वाहनाच्या भोवती लाईटच्या उजेडात फिरत होते. तर बिबट मादी काही अंतरावर उभी होती, असे सांगण्यात आले. बिबट आणि बछड्याच्या भेटीचे प्रयत्न दोन वेळा होईल. यात भेट झाली नाही तर त्याला नागपूर येथील गोरवाडा येथे पाठविण्यात येईल, अशी माहिती वनविभागाने दिली.