टिचभर पोटासाठी अखेर मातृत्व झाले कठोर...! गरिबीचा श्राप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 06:00 PM2024-11-16T18:00:48+5:302024-11-16T18:10:10+5:30
Wardha : चिमुकल्या बाळाला घेऊन महिलेची गावभर भ्रमंती
प्रफुल्ल लुंगे
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : पोटाची खळगी भरण्यासाठी वाटेल ते काम करावे लागते. त्यात गरिबीचा शाप असला की, टिचभर पोटासाठी जीवन-मरणाचा संघर्ष अनेकांच्या नशिबी येतो. असाच एक हृदयद्रावक प्रकार शहरातील वडगाव मार्गावर असलेल्या पोस्ट ऑफिस परिसरात दिसून आला. पाषाणहृदयी माणसाचेही मन आपोआप बेचैन झाले. एक महिला साहित्य विक्रीसाठी चिमुकल्या बाळाला घेऊन उन्हातान्हात फिरताना दिसून आली. झाडाखाली विसावा घेत स्तनपान करून त्या बाळाला टोपल्यात झोपवून दिले.
'पापी पेट का सवाल है भाई...!' एवढेच उत्तर त्या महिलेकडून ऐकायला मिळाले आणि त्या गोंडस बाळाकडे पाहून अनेक महिलांचे मातृत्व जागे झाले. मात्र, जन्मदात्री परिस्थिती समोर कशी हतबल झाली याचे जिवंत चित्रण 'याचि देही, याचि डोळा' सर्वांनी अनुभवले.
बाळ त्या टोपल्यात सर्व विश्वाचा आनंद घेत होते. गोजिरवाणे बाळ येणाऱ्या-जाणाऱ्याकडे पाहून खुदूखुदू हसत होते. गरिबाच्या मुलाला पाळणा नाही किंवा चांगले छतही नाही. त्यासाठी त्याची रडारडही नव्हती. ऊन, वारा पाऊस हे सर्व ऋतू अंगावर झेलत मातेचे बाळाप्रती असलेले कोमल हृदय परिस्थिती समोर कसे कठोर होते याचा अनुभव या दृश्याकडे पाहिल्यावर अनेकांना आला. गरिबांच्या मुलांना भर रस्त्यावर घमेल्यात झोपविण्याचा त्या मातेचा प्रयत्न तिला किती वेदना देऊन जात असेल याची कल्पना कधी कुणी केली नाही. टिचभर पोटासाठी गरिबांना काय काय करावे लागते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
गरिबी झाली शाप
लेकुरवाळी बाई जिला मुलाची काळजी घेण्यासाठी घरी असायला हवे ती महिला पदर खोसून कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी चिमुकल्या बाळाला घेऊन दारोदारी फिरते. त्या महिलेचा स्वाभिमान अजूनही जागा असून सन्मानाने जगण्यासाठी तिची घडपड अनेकांना प्रेरणा देऊन गेली. असे असले तरी गरिबी किती शाप आहे, ती निष्पाप चिमुकल्या जीवालाही परिस्थितीचे कसे चटके देते, याचा अनुभव या घटनेवरून अनेकांना उघड्या डोळ्ळ्यांनी पाहायला मिळाला.