बेदम मारहाणीतूनच झाला मोतीरामचा मृत्यू
By admin | Published: May 10, 2014 12:27 AM2014-05-10T00:27:09+5:302014-05-10T00:27:09+5:30
पुलगाव तालुक्यातील रसुलाबाद येथील मोतीराम पंजाब मेश्राम यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्ससंस्कारही करण्यात आले.
वर्धा : पुलगाव तालुक्यातील रसुलाबाद येथील मोतीराम पंजाब मेश्राम यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्ससंस्कारही करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून गावातील काही लोकांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाचा मुलगा आकाश मेश्राम याने केला आहे. या आरोपाचे निवेदन त्यांने पुूलगाव पोलिसांना दिले असून मारहाण करणार्यांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे. निवेदनात असलेल्या माहितीनुसार, रसुलाबाद येथील मोतीराम मेश्राम यांचा २४ एप्रिल २०१४ ला मृत्यू झाला. गावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर गावातील अनेकांनी तुझ्या वडिलांना बेदम मारहाण झाल्यानेच त्यांचा जीव गेला, अशी माहिती आकाशला दिली. २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास गावातील सहा जणांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली, यातच त्यांचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी मी गावातील रामभाऊ तांबे यांच्याकडील लग्नसमारंभात होतो. रात्री १० वाजता मी घरी परत आलो. माझ्या वडिलांनी मला या लोकांनी मारहाण केल्याचे सांगितले. परंतु, किरकोळ मारहाण झाली असे समजून मी उद्या जे काही करायचे ते करू, असे सांगून त्यांची समजूत काढली. दुसर्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, असे निवेदनात म्हटले आहे. संशय असल्यामुळे माझ्या वडिलांना मी अग्नी दिला नाही, त्यांचा मृतदेह पुरला. आरोपींनी माझ्या वडिलांच्या गुप्तांगावर, छाती, पोटावर मारहाण केल्याने त्यांना गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा आरोपही केला आहे. वडिलांच्या मृत्यूची चौकशी करावी, साक्षीदारांच्या साक्षी नोंदवाव्या आणि पुरण्यात आलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करावे, अशी मागणी आकाश मेश्राम याने निवदेनातून केली आहे. त्यांनी पोलिसात दिलेल्या निवदेनावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)