चौघांवर फसवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 09:54 PM2019-07-08T21:54:00+5:302019-07-08T21:54:37+5:30
नजीकच्या मांडवा येथील शेतकरी कृष्णा शेंडे याने शेतातच विष प्राशन केल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेवाग्राम येथील रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आल्यानंतर सेवाग्राम पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत प्रकरण पुढील कारवाईसाठी सावंगी पोलिसांकडे वळते केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नजीकच्या मांडवा येथील शेतकरी कृष्णा शेंडे याने शेतातच विष प्राशन केल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेवाग्राम येथील रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आल्यानंतर सेवाग्राम पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत प्रकरण पुढील कारवाईसाठी सावंगी पोलिसांकडे वळते केले. या प्रकरणी चौकशी अंती सावंगी पोलिसांनी कृष्णा शेंडे याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासह त्यांची फसवणूक करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, प्रदीप हिवरे, प्रदीप रामटेके, वर्षा हिवरे व महेंद्र परिमल यांनी संगणमत करून शेतकरी कृष्णा शेंडे याला प्लॉटची विक्री करावयाची आहे, तू साक्षदार म्हणून चाल असे सांगून सोबत नेले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी शेतकरी शेंडे याला कुठलीही माहिती न देता त्याच्या नावाने असलेली शेती हिवरे आणि रामटेके यांच्या नावाने करून घेतली. ही बाब लक्षात येताच शेतकरी कृष्णा शेंडे यांनी शेतीचा ताबा देण्यासाठी विरोध दर्शविला. असे असतानाही प्रदीप हिवरे, प्रदीप रामटेके, वर्षा हिवरे यांनी दबावतंत्राचा वापर करून महेंद्र परिमल यांच्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन शनिवार ६ जुलैला शेताचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांच्या जाचाला कंटाळून शेतकरी कृष्णा शेंडे याने शेतातच विष प्राशन केले. शिवाय यापूर्वीही हिवरे आणि रामटेके यांनी बळजबरी शेताचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आल्याने या चौघांवर सावंगी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०६, ४२०, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. आरोपींपैकी प्रदीप रामटेके याला सावंगी पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धोंगडे करीत आहेत.