खासदार तडस उतरले कुस्तीच्या आखाड्यात; युवा कुस्तीपटूंना दिले अनुभवाचे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 01:51 PM2022-03-05T13:51:23+5:302022-03-05T14:04:23+5:30
विशेष म्हणजे खासदार रामदास तडस हे स्वत: विदर्भ केसरी राहिले आहेत.
वर्धा : विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचा सराव पाहण्यासाठी खासदार रामदास तडस हे देवळी येथील स्टेडियमवर गेले होते. यावेळी त्यांनाही सरावात भाग घेण्याचा मोह आवरता आला नाही व ते थेट आखाड्यात उतरले. त्यांनी खेळाडूंना कुस्तीचे डावपेच शिकविले.
विशेष म्हणजे खासदार तडस हे स्वत: विदर्भ केसरी राहिले आहेत. राजकारणाच्या आखाड्यात उतरल्यानंतरही त्यांच्यातील पैलवनीचे कौशल्य भल्या-भल्यांना चित करेल असेच आहे. देवळीतील मैदानावर सराव करीत असलेल्या कुस्तीगिरांना कुस्तीतील डाव शिकविले. यावेळी उपस्थितांनाही त्यांच्या मधील कसलेला कुस्तीपटूही पाहण्याची संधी मिळाली.
दरम्यान, ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक खेळाडूला हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने खासदार क्रीडा महात्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव (खं.) येथे धनुर्विद्या स्पर्धेच्या सुरुवातीने या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. तर समारोप देवळी येथे १ ते ३ एप्रिल या काळावधीत आयोजित विदर्भस्तरीय महिला व पुरुष कुस्तीगीर स्पर्धेने होणार आहे. खासदार महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दत्तक घेतले जाणार असल्याचेही खा. रामदास तडस नुकतच एका पत्रपरिषदेत म्हणाले होते.