खासदारांनी घेतला क्रीडा संकुलातील सुविधांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:29 PM2017-12-08T23:29:39+5:302017-12-08T23:29:53+5:30
खासदार रामदास तडस यांनी येथील जिल्हा क्रीडा संकुल गाठून तेथील सोई-सुविधांचा आढावा जाणून घेतला.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : खासदार रामदास तडस यांनी येथील जिल्हा क्रीडा संकुल गाठून तेथील सोई-सुविधांचा आढावा जाणून घेतला. या क्रीडा संकुलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल असून क्रीडा संकुलातील सुविधांबाबत खा. तडस यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा क्रीडा संकुल परिसरात खेळाडू व वयोवृद्धांसाठी व्यायाम शाळा तयार करण्यात आली आहे. तसेच अद्यावत इलेक्ट्रीक शुटींग रेंज तयार करण्यात आलेला आहे. या सुविधांचा खेळाडूंना फायदा होणार आहे. सध्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी या खेळाची मैदाने तयार होत आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्ट तयार केला आहे. जिल्हा क्रीडा संकुलात इन्डोर खेळांसाठी व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अॅकॉस्टीक हॉलची निर्मिती करण्यात आली असून लवकरच खेळाडूंसाठी व इतर कार्यक्रमासाठी ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
जिल्हा क्रीडा संकुल प्रकाशमय करण्यासाठी ४०० मीटर रनींग ट्रॅकवर व इतर भागात एल. ई. डी. लाईट लागत असून त्याचा सायंकाळी सराव करणाºया खेळाडूंना लाभ होणार आहे. या क्रीडा संकुलात एक सुसज्ज उपहारगृह बचत गटाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नवाल यांच्या संकल्पनेतून महसूल विभाग व जिल्हा क्रीडा संकुल व्यवस्थापन समिती तसेच बचत गटाच्या माध्यमातून ‘सायकल चालवा प्रदूषणाला आळा घाला’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात दहा सायकल जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. अल्पश: भाडेतत्वावर त्या नागरिकांना दिल्या जातात. जिल्हा क्रीडा संकुल व्यवस्थापन समितीला शासनाकडून कुठल्याही देखभाल दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होत नाही याची माहितीही यावेळी खा. रामदास तडस यांनी जाणून घेतली. यामुळे खेळाडूंना विविध सुविधा मिळणार आहे.
ओपन जिमची संकल्पना नाविण्यपूर्ण- तडस
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा क्रीडा संकुल येथे तयार करण्यात आलेल्या ओपन जिमची संकल्पना नाविण्यपूर्ण आहे. या खुल्या व्यायाम शाळेचा नक्कीच मैदानी व विविध खेळ खेळणाºया खेळाडूंसह वृद्धांना फायदा होणार आहे. विविध खेळांचा नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंनी या ओपन जिमचा लाभ घेतला पाहिजे. खासदार म्हणून आपण जिल्हा क्रीडा संकुलात योग्य सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी खा. तडस यांनी दिले.